E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआंदोलनमहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़
आमदार रविशेठ पाटील आक्रमक
रोहा तहसीलदारांना तातडीने कार्यवाहीचे आदेश

नागोठण्यातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आमदार रविशेठ पाटील आक्रमक
रोहा तहसीलदारांना तातडीने कार्यवाहीचे आदेश
नागोठणे | महेश पवार
नागोठणे परिसरातील पूरग्रस्त व्यापारी वर्गाला शासनाकडून मंजूर होणारी नुकसानभरपाई मिळण्यास होत असलेल्या दिरंगाईच्या पार्श्वभूमीवर भाजप व्यापारी सेल रायगड जिल्हाध्यक्ष सचिन मोदी व भाजप रोहा तालुका महामंत्री आनंद लाड यांनी स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांची पेण येथील निवासस्थानी भेट घेऊन नागोठण्यातील व्यापाऱ्यांची कैफियत मांडली. यावेळी व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास महसूल विभागाकडून होत असलेला विलंब, वारंवार मागविण्यात येणारी कागदपत्रे तसेच तलाठी कार्यालयात वारंवार जाण्याचा व्यापाऱ्यांना होणारा त्रास याबाबत सचिन मोदी यांनी आमदार रविशेठ पाटील यांचे लक्ष वेधले.
व्यापाऱ्यांची समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदार रविशेठ पाटील यांनी तात्काळ रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नागोठण्यातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत विचारणा केली. व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून त्यांना शासनाची नुकसानभरपाई मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी रोहा तहसीलदारांना दिले.
यावेळी तहसीलदार किशोर देशमुख यांनी आमदारांना माहिती देताना नागोठण्यातील व्यापाऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नसून, शासनाच्या नियमानुसार काही कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगितले. मात्र, भाजप व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन मोदी यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. व्यापाऱ्यांकडून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे एकाच वेळी मागविण्याऐवजी वारंवार वेगवेगळी कागदपत्रे मागविली जात असल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पूरामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
व्यापाऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शासनाने केवळ आश्वासने न देता नुकसानभरपाई वितरणासाठी निश्चित तारीख जाहीर करून व्यापाऱ्यांना त्वरित मदत द्यावी. आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे एकदाच मागवावीत,” अशी मागणी सचिन मोदी यांनी केली आहे. तसेच याबाबत आमदार रविशेठ पाटील यांच्या समवेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आणि नागोठण्यातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसानभरपाई मिळेपर्यंत आपण शांत बसणार नाही असे शेवटी सचिन मोदी यांनी सांगितले.




