Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

आगामी सण–उत्सव उत्साहात पण शांततेत साजरे करा : सपोनि सचिन कुलकर्णी

नागोठण्यातील भाईचारा टिकवून ठेवण्याचे आवाहन

आगामी सण–उत्सव उत्साहात पण शांततेत साजरे करा : सपोनि सचिन कुलकर्णी

नागोठण्यातील भाईचारा टिकवून ठेवण्याचे आवाहन

नागोठणे | महेश पवार

आगामी काळात येणारे होळी, धुलीवंदन, शिवजयंती उत्सव, रंगपंचमी व रमजान ईद आदी सण खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात व शांततेत पार पाडा. आपण सर्वजण एक असून आपण भाईचाऱ्याने राहत असल्याने हा भाईचारा टिकविणे आपल्याच हातात असल्याने हा भाईचारा टिकवून ठेवा. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सहकार्य करून तुम्हीच आमचे नाक, कान व डोळे बनून येणारा होळी व इतर सण सर्वांनी मिळून, शिस्तीचे पालन करून, नियमांचे उल्लंघन न करता व कायदा हातात न घेता आनंदाने साजरे करा असे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी नागरिकांना केले.

आगामी येणारे सण, उत्सव साजरे करण्याच्या अनुषंगाने नागोठणे पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. २८) सकाळी शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, महिला दक्षता सदस्य, व्यापारी, पत्रकार, पोलीस पाटील, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ अध्यक्ष यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना स. पो. नि. सचिन कुलकर्णी बोलत होते. यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक गोटीराम पावरा, पो. हे. कॉ. अथर्व पाटील, पो. शि. स्वप्नील भालेराव, नागोठणे शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष इम्रान पानसरे, अकबर पठाण, हरिष धामणे, सलीम अत्तार, पत्रकार, विभागातील पोलिस पाटील व नागरिक उपस्थित होते.

सपोनि सचिन कुलकर्णी मार्गदर्शन करताना म्हणाले की, होळी ज्या जागेवर लावायची आहे त्यावरून वाद करू नका, वाद असतील तर आधी कल्पना द्या. सण, उत्सव यामध्ये डिजे न वाजविता पारंपरिक वाद्ये वाजवितानाच दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन वाद्य वाजवण्यासाठी दिलेल्या वेळेचे बंधन पाळा, महिला वर्गाने बस मधून प्रवास करतांना आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी व सजग रहावे तसेच गर्दीच्या ठिकाणी व बाजारात दागिने घालून एकट्या महिलेने जाऊ नये, पोलिस व शासनाने लावलेल्या सर्व निर्बंधाचे पालन करा, बाहेरगावी असलेली  मंडळी सणासाठी गावी येत असल्याने जुन्या विषयावरून वाद करू नका, सणांमध्ये दारू व इतर अंमली पदार्थांचे सेवन करून दुसऱ्याला त्रास होईल असे कृत्य करू नका . तसे केल्यास आम्हाला कडक कारवाई करावी लागेल असा कडक  इशाराही यावेळी सपोनि सचिन कुलकर्णी यांनी दिला.

सोशल मीडियावर कोणताही आक्षेपार्ह व वादग्रस्त मेसेज टाकू नका, आलेल्या कोणत्याही पोस्टची खात्री करून, वाचून त्याचे अवलोकन करा, नंतरच ती पोस्ट लाईक व शेअर करा. पोलिस प्रशासन आपल्यासाठी नेहमीच कार्यरत आहे मात्र कोणतीही माहिती मिळाली तर तुम्ही कायदा हातात न घेता पोलिसांना कळवा. बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवा व काही संशयास्पद वाटल्यास थेट मला संपर्क करा. तसेच पुढील काळात येणारे सर्वधर्मीय सण व उत्सव शांततेत साजरे करा आणि शांतताप्रिय नागोठण्याला गालबोट लावू देऊ नका असे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. या बैठकीत उपनिरीक्षक गोटीराम पावरा व पो. हे. कॉ. अथर्व पाटील यांनीही उपस्थित नागरिकांना आवश्यक त्या सूचना केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!