E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
पळस येथील जागृत देवस्थान पळसाई मातेचा आज पालखी सोहळा
रांगोळ्या आणि पताक्यांनी सजले पळस गाव

पळस येथील जागृत देवस्थान श्री पळसाई मातेचा गुरुवारी पालखी सोहळा
रांगोळ्या आणि पताक्यांनी सजले पळस गाव
नागोठणे | महेश पवार
चारशे हून अधिक वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रोहा तालुक्यातील नागोठण्याजवळील पळस येथील श्री पळसाई मातेचा चैत्र पालखी सोहळा गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी साजरा होत आहे. त्यामुळे पळस गावातील नागरिकांत, विशेष करून महिला व तरुण वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. चैत्र पालखी सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व विविध रंगी फुलांची सजावट करण्यात आली असून पळस गावात सर्वत्र रांगोळ्या काढून पताका लावून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे पळस गाव आकर्षकरित्या सजल्याचे पहावयास मिळत आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये गणल्या जाणाऱ्या रोहा तालुक्यातील पळसाई देवीच्या उगम स्थानापासून ते अगदी स्थापनेपर्यंतच्या अनेक कथा पळस गावातील जुने जाणते बुजुर्ग मंडळींकडून आजही सांगितल्या जातात.पळस गावात राहणारा बहुतांश समाज हा जरी मराठी वर्गात येत असला तरी या देवीच्या उगम स्थानापासून स्थापनेपर्यंत जोडलेली सर्व नाती ही मराठी समाजाबरोबरच येथे पूर्वाश्रमी पासून राहणाऱ्या आगरी समाजातील भोपी कुटुंबीयांशी अधिक दृढ असल्याचे सांगण्यात येते. श्री पळसाई मातेच्या विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावातील लोक एकत्र येत असल्याने गावातील एकोपा टिकून राहत असल्याची माहिती श्री पळसाई माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी दिली.
नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्धी असलेल्या तसेच भक्तगणांना देवीची तशी प्रचीती येत असल्याने संपूर्ण रायगड बरोबरच ठाणे, मुंबई, पुणे येथून दरवर्षी येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढतच असल्याचे अलीकडील काही वर्षांपासून पहावयास मिळत आहे. मुंबई व इतरत्र ठिकाणी कामानिमित्त असलेली परिसरातील मंडळी तसेच माहेरवाशिणी या न चुकता चैत्र पालखी सोहळ्यासाठी व नवरात्रोत्सवासाठी पळस येथे येतात. विशेष म्हणजे नवसपूर्ती नवस फेडण्यासाठी येणारी महिला व पुरुष मंडळी ही नऊ दिवस मंदिरात राहतात. यावेळी मंदिरात राहणाऱ्या भक्तांसाठी सामूहिक भोजनही ठेवण्यात येते. नवरात्रोत्सवात नऊ दिवसांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पाचव्या माळेचे येथे असलेले अनन्य साधारण महत्व हे या नवरात्र उत्सवातील येथील प्रमुख आकर्षण असते. या दिवशी लाखोंच्या संख्येने भक्तगण देवीच्या दर्शनासाठी मंदिरात येतात आणि त्यावेळी मंदिर परिसराला एखाद्या मोठ्या जत्रेचे स्वरूप येते. नवरात्र उत्सवाप्रमाणेच यंदाही चैत्र पालखी सोहळा निर्विघ्नपणे व भक्तिमय वातावरणात, उत्साहात साजरा होण्यासाठी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ व महिला मंडळ मेहनत घेत आहेत.




