
एमबीए सीईटी परीक्षेत वांगणीतील कु. मंथन ठाकूर याचे यश
नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा तर्फे (सीईटी कक्ष) एप्रिल, २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन आणि मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीच्या सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नागोठण्याजवळील वांगणी येथील कु. मंथन कांचन ठाकूर याने उज्वल यश संपादन केले आहे. मंथन ठाकूर याने या परीक्षेला सामोरे जातांना पहिल्याच प्रयत्नात ९०.०४ टक्के गुण मिळवून उत्तम यश मिळविले आहे.
कु. मंथन ठाकूर याने यापूर्वी लोणेरे – माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी (बाटू) मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेतून अभियांत्रिकी पदवी मिळविली असून त्याने काही काळ नोकरीही केली आहे. मात्र मंथन याला बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन क्षेत्रात असलेल्या आवडीमुळे त्याने एमबीए सीईटी परीक्षा देण्याचे ठरविले आणि कठोर परिश्रम करीत त्याने पहिल्याच प्रयत्न ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे. कु. मंथन ठाकूर याने बांद्रा – मुंबई येथील भुजबळ नॉलेज सिटी मधील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या मुंबईतील सर्वोत्तम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये बिझनेस एनालिटिक्स या दोन वर्षीय पूर्णवेळ अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला आहे.
व्यवसायातील डेटा (माहिती) आणि सांख्यिकीय पद्धतींचा अभ्यास करून योग्य निर्णय घेणारा व्यवसाय विश्लेषण अर्थात बिझनेस एनालिटिक्स या विषयात कु. मंथन ठाकूर पद्युत्तर पदवीचे शिक्षण घेणार आहे. कु. मंथन ठाकूर याच्या सीईटी परीक्षेतील या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




