E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्यलोकल न्यूज़शिक्षणसहकार

मानवतेचा धर्म ठेवून काम

मानवतेचा धर्म ठेवून काम करीत असल्याने श्री जोगेश्वरी मर्चंट पतसंस्थेला यश : किशोरशेठ जैन

पतसंस्थेच्या ठेवी पोहोचल्या १५ कोटींवर : सभासदांना १० लाभांश जाहीर 
पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
नागोठणे | महेश पवार
श्री जोगेश्वरी मर्चंट पतसंस्था कासवाच्या चालीने चालली पण यशाकडे गेली.  त्यामुळेच पतसंस्थेत पंधरा कोटींच्या ठेवी जमा होऊन २५ कोटींच्या  वर उलाढाल झाली आहे.  संस्थेला आजपर्यंत कायम “अ” वर्ग ऑडिट मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पत नसलेल्या लोकांना उभे करणे हे पतसंस्थेचे काम असते असे म्हटले होते, तेच काम आमच्या पतसंस्थेने गेली २७ वर्षे केले असून संकटकाळी आठवण येणारी ही आपली पतसंस्था आहे. राजकीय प्रवासात असतानाही संस्थेत कधीच उलट सुलट विषय आणले नाही.  नेहमीच मानवतेचा धर्म ठेवून काम केल्यानेच आपली ही पतसंस्था यशस्वी झाल्याचे गौरोद्गार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोरशेठ जैन यांनी पतसंस्थेच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काढले. तसेच पतसंस्थेला सुमारे २५ लाख १३ हजार रुपयांचा नफा झाल्याने सभासदांना दहा टक्के लाभांशही यावेळी किशोर शेठ जैन यांनी जाहीर केला. 
नागोठण्यातील आराधना भवन येथे रविवारी (दि.३०) सायंकाळी सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला किशोरभाई जैन यांच्या समवेत श्री जोगेश्वरी देवस्थान विश्वस्त समिती सचिव भाई टके, रायगड जिल्हा नियोजन सहनियंत्रक समितीचे सदस्य शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीचे सभापती सदानंद गायकर, मधुकर ठमके,  नागोठणेचे माजी सरपंच विलास चौलकर, रोहा पं. स. चे माजी सदस्य संजय भोसले, नागोठणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशशेठ जैन, पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रकाशशेठ उर्फ घिसूशेठ जैन, सचिव संजय काकडे, संचालक पिंटूशेठ जैन, शैलेश रावकर, राजकुमार पिताणी, मोहन नागोठणेकर, नागोठणे सरपंच तथा संचालिका सुप्रिया महाडिक, विजया परमार, कल्पना टेमकर, व्यवस्थापक सुनील नावले यांच्यासह मोठया संख्येने सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
पतसंस्थेचे सचिव संजय काकडे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेपासूनचा विविध बाबतीतील आढावा सादर केला तसेच गेली २७ वर्षे सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकल्याने संस्था प्रगतीकडे वाटचाल करीत आहे असे स्पष्ट केले. नंतर त्यांनी वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक याचे वाचन केले त्याला सर्व सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली.  उपाध्यक्ष प्रकाश जैन यांनी आपल्या मनोगतात  किशोर जैन यांचा उल्लेख कॅप्टन धोनी असा केला. कॅप्टन धोनी यांनी जसे संघाला नेहमी संकटातून बाहेर काढले तसेच किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कधीही डगमगलो नाही अशी ही संस्था आहे असे कौतुकास्पद उद्गार काढले. तर मागील वार्षिक सभेच्या  इतिवृत्ताचे वाचन व्यवस्थापक सुनील नावले यांनी केले.

पतसंस्थेकडून मान्यवरांचा यथोचित सन्मान :-

या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्य सरकारमध्ये जीएसटी अधिकारी म्हणून रुजू झालेली वांगणी गावातील सुकन्या  कुमारी ऋतुजा प्रभाकर ठाकूर, रिलायन्स कंपनीतील सेवानिवृत्ती बद्दल संस्थेचे सचिव संजय काकडे, नागोठणे लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विलास चौलकर,  लायन्स क्लबच्या महिला सक्षमीकरण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विवेक सुभेकर, सेवानिवृत्त सैनिक महेंद्र घोगरे(वणी), महेंद्र घासे (आंबेघर), कंपनी सेक्रेटरी परीक्षा उत्तीर्ण झालेला कु.  सोहम अनंत इंद्रे, बी फार्मसी परीक्षा उत्तीर्ण झालेली कुमारी अंतरा दीपक गायकवाड तसेच दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी कु. साहिल संतोष नागोठणेकर कुमारी अनुष्का यशवंत यादव, कुमारी साक्षी संतोष घाग तसेच पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 
याच वार्षिक सभेत पतसंस्थेच्या मूळ पोटनियमातील संस्थेचे कार्यक्षेत्र नागोठणे परिसर व रोहा तालुका मर्यादित राहील यामध्ये उपविधी दुरुस्ती करून सभासदांना विस्तारित सेवा देता यावी म्हणून व्यवसाय वाढीसाठी संस्थेचे कार्यक्षेत्र रायगड जिल्हा भौगोलिक क्षेत्रापुरते मर्यादित राहील अशी दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार शिहू (ता. पेण) येथील समर्थकृपा पतसंस्था श्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेत विलीन करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. कर्जदारांचा वैयक्तिक विमा दोन लाख रुपयांवरून दहा लाख रुपये वाढविणे, कर्ज मर्यादा दहा लाखांवरून १५ लाख रुपये करणे, सोनेतारण कर्जासाठी कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्रांमध्ये वैयक्तिक कर्ज पुरवठा आदी सभासद हिताचे अनेक निर्णय या वार्षिक सभेत घेण्यात आले. या संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन सचिव संजय काकडे यांनी केले.  ही सभा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक सुनील नावले व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 
खासदार सुनील तटकरे साहेबांच्या कार्यक्षमतेचा  नागोठण्याच्या विकासासाठी १०० टक्के उपयोग करून घेणार हा शब्द : नागोठणेतील शुद्ध पाण्यासाठी रिलायन्सचा उपयोग करून घेणार :-
मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे.  दिल्लीत खासदार सुनील तटकरे साहेब आहेत, राज्यात मंत्री अदितीताई आहेत तर आपल्या रोहा तालुक्यात आमदार अनिकेत भाई यांचे आपल्याला वेळोवेळी, पूर्ण सहकार्य मिळत आहे. खासदार तटकरे साहेबांच्या सहकार्याने जोगेश्वरी नगर येथे शंभर कोटींचा रेल्वे क्रॉसिंग पुलाला  मंजुरी मिळाली आहे. कोरोना पूर्वी नागोठणे स्थानकात थांबणाऱ्या दिवा सावंतवाडी गाडीला पूर्ववत थांबा,  रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, डिजिटल इंडिकेटर, प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी सरकते जिने असलेला पादचारी पूल, अंबा नदीची खोली,  संरक्षण भिंत,  यासारखेच पुढे अनेक विषय आहेत. याशिवाय नागोठण्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या शुद्ध पाणीपुरवठासाठी रिलायन्सचा उपयोग कसा करून घ्यायचा यासाठी लवकरच खासदार तटकरे साहेब बैठक घेणार असल्याने खासदार तटकरे साहेबांच्या कार्यक्षमतेचा नागोठणेच्या विकासासाठी १०० टक्के उपयोग करून घेणार हा माझा शब्द असल्याचेही यावेळी किशोरशेठ जैन यांनी सांगितले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!