E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

नागोठणे पोलिस ठाण्यातील बाप्पांना भावपूर्ण निरोप 

रोहा डीवायएसपी प्रसाद गोकुळे यांचा सहभाग 

नागोठणे पोलिस ठाण्यातील बाप्पांना भावपूर्ण निरोप 

पोलिस कर्मचाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीत लुटला मनसोक्त नाचण्याचा आनंद
रोहा डीवायएसपी प्रसाद गोकुळे यांचा सहभाग 
नागोठणे | महेश पवार
गणेशोत्सव काळात नागोठणे शहर व ग्रामीण विभागात कोणताही अनुचित प्रकार घडु न देण्याची आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर नागोठणे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांंची ११ दिवस सेवा केल्यानंतर बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. नागोठण्यातील अंबा नदी किनारील विसर्जन घाटावर शानिवारी (दि. २६) रात्री ८.३०  वा.च्या सुमारास  मोठ्या उत्साहाने संपन्न झालेल्या नागोठणे पोलिस ठाण्यातील बाप्पांच्या विसर्जन सोहळ्यात रोहा डीवायएसपी प्रसाद गोकुळे,  यांच्यासह नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि रविंद्र पारखे, पोलिस उपनिरिक्षक राजहंस नागदिवे, उपनिरीक्षक जि. डी. पावरा, उपनिरीक्षक सुरज पाटील यांच्यासह सर्व पोलिस कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय, पत्रकार व नागरिक सहभागी झाले होते.  
गणेशोत्सव काळात बंदोबस्तामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना रजा मिळत नसल्याने त्यांना आपल्या गावी जाता येत नाही. त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील बहुतांश पोलिस ठाण्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असतो. त्यामुळेच गणेशोत्सव काळातील आपले कर्तव्य  बजावुन गणपती बाप्पांची सेवा ड्युटीवर असतानाच करण्याची संधी पोलिस कर्मचाऱ्यांना मिळत असते. त्यानुसारच नागोठणे पोलिस ठाण्यालगत असलेल्या श्री दत्त मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
अनंतचतुर्दशीच्या बाप्पांचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आल्यामुळे गणेशोत्सव बंदोबस्तातून मोकळे झालेल्या नागोठण्यातील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी सात  वाजण्याच्या सुमारास आपल्या बाप्पांची वाजत गाजत मिरवणूक काढली. पोलिस ठाण्यात नेहमी वर्दीत दिसणाऱ्या मात्र विसर्जन मिरवणुकीसाठी खास वेशभूषा केलेल्या महिला पोलिस कर्मचारी,  गणेश विसर्जनासाठी खास तयार केलेले पिवळ्या रंगाचे कुर्ते परिधान केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी पारंपारिक बेंजोच्या तालावर ठेका धरत विसर्जन मिरवणुकीत मनसोक्तपणे नाचण्याचा आनंद लुटला. 
नागोठणे पोलिस ठाण्यापासून निघालेली पोलिस ठाण्यातील बाप्पांची ही मिरवणूक बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे अंबा नदीच्या विसर्जन घाटावर नेण्यात आली.  याठिकाणी गणपती बाप्पांची पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकडून सामूहिक आरती घेतल्यानंतर रात्री  ८.३० वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यातील बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!