नागोठण्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर ४६५ विद्यार्थी
दहावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू

नागोठण्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर ४६५ विद्यार्थी
दहावीची परीक्षा सुरळीतपणे सुरू
नागोठणे | महेश पवार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावीची परीक्षा कोकण एजुकेशन सोसायटीच्या नागोठण्यातीलअग्रवाल विद्यामंदिर केंद्र क्रमांक ७८११ या परीक्षा केंद्रावर शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी पासून सुरु झाली. या परीक्षा केंद्रासाठी १९ वर्ग खोल्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागोठणे केंद्रावर नागोठण्यातील अग्रवाल विद्यामंदिरसह उर्दू हायस्कूल, होली एंजल्स स्कूल, रिलायन्स फाउंडेशन स्कूल, एस. डी. परमार स्कूल, वांगणी हायस्कूल, पळस विद्यालय, वेलशेत हायस्कूल, शिहू हायस्कूल, रानपाखरं आश्रम शाळा या दहा शाळांमधील दहावीचे विद्यार्थी मिळून सुमारे ४६५ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

शिक्षणाच्या पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्वाची मानली जाणारी दहावीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील शिक्षण मंडळाची पहिलीच महत्वाची परीक्षा असल्याने नागोठणे केंद्रावर आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागोठणे केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी अग्रवाल शाळेचे मुख्याध्यापक व केंद्र संचालक डी.एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप केंद्रसंचालक आर. टी. जेडगे, बिल्डिंग कंडक्टर संध्याराणी सरगडे, स्टेशनरी सुपरवायझर विजय शीद, लिपिक शरद तळपाडे यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी सहकार्य करीत आहेत. दहावीच्या नागोठणे केंद्रावर नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिस, एक पुरुष होमगार्ड व एक महिला होमगार्ड यांच्यामार्फत नागोठण्यातील परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.




