Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

वाहतूक कोंडीचे विघ्न संपता संपेना ! 

एस. टी. स्थानकासमोरील रस्त्यावर लागली लांबच लांब रांग 

नागोठणे शहरातील वाहतूक कोंडीचे विघ्न संपता संपेना ! 

एस. टी. स्थानकासमोरील रस्त्यावर लागली लांबच लांब रांग 
नुक्कड गल्ली झालेय खाऊ गल्ली व पार्किंग गल्ली 
वाहतुक पोलीसही हतबळ : ठोस उपाय योजनेची गरज

महेश पवार

नागोठणे : नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज  चौक परिसर, एस. टी. स्थानकासमोरील रस्ता, मासळीबाजारकडे व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता तसेच पोलीस ठाण्याकडे जाणा-या रस्त्यावरील नुक्कड गल्लीत वारंवार होणा-या व दिवसेंदिवस वाढणा-या वाहतुक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही जणांनी बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे व रस्त्याच्या कडेला खेटून उभ्या केलेल्या हातगाडींमुळे सोमवारी (दि.२९) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नागोठणे एस टी स्थानकासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची लांबच लांब रांग लागल्यामुळे अनेक दुचाकी व रिक्षा चालकांना आपली वाहने मागे वळवून दुसऱ्या मार्गाने जावे लागले. नागोठण्यातील वाहतूक कोंडीचे विघ्न संपता संपत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने आता बघ्याची भूमिका घेणे सोडून व आपल्या व्यवसायासाठी रस्त्याच्या कडेला खेटून बसणाऱ्यांचे लाड न पुरविता पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने ॲक्शन मोडवर येण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

दुकानदारांनी छ. शिवाजी महाराज चौकात अतिक्रमण करून ठेवलेत पोटभाडेकरू 

नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौक परिसरात दोन्ही बाजुला असलेली किराणा, मिठाई व इतर दुकाने, हॉटेल्स, मेडिकल स्टोअर,  हातगाड्या तसेच प्रशस्त भाजीबाजार इमारतीत न बसता रस्त्याला खेटूनच बसलेले भाजीविक्रेते व इतर लहान मोठी दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व दुकानांत मोटारसायकलवरुन येणारे ग्राहक रहदारीच्या रस्त्यावरच आपली वाहने उभी करतात. दुकानदारही आपला धंदा बुडू नये यासाठी याप्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच छ. शिवाजी महाराज चौक परिसरात अनेक मालकांनी आपली दुकाने भाड्याने दिली असल्याने या भाडेकरू धंदेवाल्यांनी समोरील मोकळ्या जागेतही अतिक्रमणे करून वेगवेगळी दुकाने थाटली आहेत. नागोठणे ग्रामपंचायत प्रशासन या विविध प्रकारच्या व्यावसायिक धंदेवाल्यांकडून १० रुपयांची पावती रोज फाडत असल्याने रस्त्याकडेची जागा आपल्याच मालकीची असल्याचा समज या धंदेवाल्यांचा झाल्याचे चित्र नेहमीच दिसून येत आहे.  त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या या रस्त्यावरून जाणारी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास छ. शिवाजी महाराज चौक परिसरात व नुक्कड गल्ली मध्ये वारंवार वाहतुक कोंडी होत आहे. विशेष करुन सायंकाळच्या वेळेत हे वाहतुक कोंडीचे प्रमाण खुप मोठे आहे. या वाहतुक कोंडीचा मोठा फटका नागोठणे स्थानकात येणा-या एस.टी.बसचालकांना बसत आहे. रस्त्यावरच उभ्या करण्यात येणा-या चार चाकी, दुचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन त्यात एस टी बसेस अडकून राहत आहेत.  शिवाजी चौक परिसरातुन एस.टी.बस स्थानकात नेतांना चालकांना तारेवरची कसरत आहे. त्यामुळे कित्येकदा एस.टी. चालक, दुचाकीस्वार व रस्त्याच्या कडेला बसलेले व्यावसायिक धंदेवाले यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. 

नुक्कड गल्ली बनलेय खाऊ गल्ली व पार्किंग गल्ली 
येथील अरुंद नुक्कड गल्लीत दोन्ही बाजूला पूर्वी एक–दोनच खाद्यपदार्थांची दुकाने होती. मात्र आता गेल्या काही महिन्यांत नुक्कड गल्लीत विविध प्रकारची खाद्य पदार्थांची दुकाने वाढली आहेत. या दुकानांत येणारे ग्राहक नुक्कड गल्लीतील रस्त्याच्या दुतर्फा आपली दुचाकी वाहने बिनधास्तपणे उभी करून खाद्य पदार्थांच्या दुकानात बसलेले असतात.  त्यामुळे येथून एखादे चार चाकी वाहनही काढणे जिकरीचे होत असून येथे वारंवार विशेष करून संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे.  पोलीस ठाण्यात जाण्याचा हाच मुख्य मार्ग असल्याने पोलिसांच्या वाहनालाही येथे काही वेळेस थांबून राहावे लागत असल्याचे चित्र अनेकवेळा दिसून आले आहे. 
वाहतूक पोलीसही होत आहेत हतबल 
छ. शिवाजी चौक परिसरासाठी एक – दोन वाहतुक पोलीस व होमगार्ड कार्यरत असतात.  मात्र काही वेळेस त्यांना इतरत्र ड्युटी लागल्याने येथे कधी कधी एकही वाहतूक पोलीस नसतो. बेशीस्त वाहनचालकांच्या अडमुठेपणामुळे गर्दीच्या वेळी तर एक – दोन वाहतुक पोलीस व एक दोन होमगार्ड तरी कुठे कुठे लक्ष ठेवणार ? हा मुख्य  प्रश्न असल्याने ते सुध्दा हतबळ झाल्याचे दिसुन येत आहेत.  अशा बेशीस्त वाहनचालकांवर अनेकवेळा दंडात्मक कारवाई करूनही परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे छ. शिवाजी महाराज चौक व परिसरात बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर वारंवार दंडात्मक कारवाई सुरु केल्यास रस्त्यावर वाहने उभी करणा-यांना चाप बसेल तसेच रस्त्याच्या कडेला खेटून बसणाऱ्या छोट्या छोट्या व्यावसायिकांना ग्रामपंचायत प्रशासनाने सक्त तंबी देण्याची गरज असल्याचेही नागरिकांतून बोलले जात आहे. 

पी १, पी २  पार्कींग व्यवस्था सुरू करावी 
नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौक परिसरात काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे यांनी सुरू केलेल्या सम – विषम तारखांनुसार पी १, पी २  पार्कींग व्यवस्थेचा त्यांच्या बदली नंतर बोजवारा उडाला आहे. त्यानंतर नागोठणे पोलिस ठाण्यात आलेल्या सर्व प्रभारी अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी याबाबतीत पत्रकारांनी व नागरिकांनी सांगूनही पी १, पी २  पार्कींग व्यवस्था सुरू झालेली नाही. ती पध्दत पुन्हा सुरु करावी अशीही मागणी नागरिकांतुन होत असल्याने नागोठणे पोलिस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले सपोनि रविंद्र पारखे नक्कीच याबाबतीत ठोस भूमिका घेऊन योग्य ती कार्यवाही करतील अशी अपेक्षा आहे.  दरम्यान छ.शिवाजी महाराज चौक परिसर व नुक्कड गल्ली परिसरात सायंकाळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी आपली करडी नजर ठेवावी अशीही मागणी होत आहे. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!