खेळणी वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम

ग्रुप ग्रामपंचायत पाटणसई मधील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये खेळणी वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम
नागोठणे : प्रमोददादा म्हसकर यांच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत पाटणसई मधील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये लहानग्या बालकांसाठी खेळणी वाटपाचा सुंदर आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद, त्यांचे हास्य आणि उत्साह हेच या वाढदिवसाचे खरे यश ठरले. शिक्षणासोबतच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळण्यांचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानचे विश्वास गायकर, पाटणसईचे तंटामुक्ती अध्यक्ष मोतीराम गायकर, नागोठणे रिक्षा युनियन अध्यक्ष मधुकर गायकर किसन पवार, गोविंद जाधव, युवराज पवार, सागर पवार आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम प्रमोददादा म्हसकर प्रतिष्ठानचे सुधीर ढाणे यांच्या सहकार्याने यशस्वी ठरला. कार्यक्रमाला उपस्थित शिक्षकवर्ग, अंगणवाडी सेविका, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.




