Uncategorized
जुगार अड्ड्यावर नागोठणे पोलिसांची धाड
सहा जणांवर गुन्हा दाखल : ६२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागोठणे मोहल्ल्यातील जुगार अड्ड्यावर नागोठणे पोलिसांची धाड
सहा जणांवर गुन्हा दाखल : ६२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागोठण्यात पुढील नंबर कुणाचा ?
नागोठणे | महेश पवार
नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांनी नागोठणे पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध गावठी दारू, अवैध गुटखा, जुगार अड्डे तसेच अन्य अवैध धंद्यांविरोधात मोहीम उठविली आहे. याचाच एक भाग म्हणून नागोठण्यातील मोहल्ला भागातील समीर पानसरे यांच्या दोन मजली चाळीत असलेल्या जुगार अड्ड्यावर नागोठणे पोलिसांनी धाड टाकून याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जुलै २०२६ रोजी रात्री ८:३५ वाजता नागोठणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींत समीर पानसारे (वय ५१), मोहम्मद सैय्यद (वय ७३), इरशाद इलानी (वय ३९) इमान मुल्ला (वय ३९), मुजफर कडवेकर (वय ४२ वर्षे), सादिक सिंधी (वय ४१ वर्षे) या सहा जणांचा समावेश असून सर्व आरोपी नागोठणे मोहल्ला येथील रहिवासी आहेत. या गुन्ह्यात जप्त मुद्देमालामध्ये गेम फी म्हणून जमा केलेले प्रत्येकी ३०० रुपये प्रमाणे सहा जणांचे १८०० रुपये आणि अंगझडती मधून सापडलेले रुपये ४४०० अशा एकूण ६२०० रुपये तसेच जुगारासाठी वापरलेला कागद आणि बॉलपेन हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नागोठणे पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई बळी पुट्टेवाड यांच्या फिर्यादीनुसार नागोठणे पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याच्या कलम १२ अ नुसार सहाही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय परिसरातील गावांत सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारूच्या धंद्यावरही नागोठणे पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत असून अवैध धंदे वाल्यांनी याचा धसका घेतल्याचे दिसून येत आहे. नागोठण्यात आता पुढील नंबर कुणाचा याचीही खमंग चर्चा सर्वत्र होतांना दिसून येत आहे.




