
समाजसेवक राजन (राजाभाऊ) शेलार यांचे आकस्मिक निधन
माणगावकरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
नागोठणे | महेश पवार
माणगाव तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन (राजाभाऊ) शेलार यांच्या अकस्मात निधनाने माणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
माणगाव तालुक्यातील खांदाड येथे जन्मलेल्या राजाभाऊ शेलार यांनी आयुष्यभर समाजसेवेला वाहून घेतले. लोकांच्या अडचणी सोडविणे, शासकीय कामांमध्ये मार्गदर्शन करणे आणि सर्वसामान्यांना प्रामाणिकपणे मदत करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते. त्यांचा लोकसंपर्क दांडगा असून सर्व स्तरातील नागरिकांमध्ये त्यांना विशेष मान होता.
श्रद्धांजली सभेत बोलताना संजय साबळे यांनी सांगितले की, माणगाव येथे एसटी स्थानक उभारण्यासाठी झालेल्या जन आंदोलनात राजाभाऊ शेलार यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. या आंदोलनासाठी लागणारे निवेदने, पत्रव्यवहार, अर्ज आणि शासकीय कागदपत्रांची तयारी त्यांच्या प्रभावी लेखणीतून होत असे. त्यांना प्रशासकीय कामकाजाचे सखोल ज्ञान होते. दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्या माणगाव एस.टी. स्थानकाच्या उभारणीसाठी त्यांनी संघर्ष केला, त्याच स्थानकात त्यांचा मृत्यू झाला. हा योगायोग अत्यंत वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
राजाभाऊ यांनी लोकप्रिय दिवंगत आमदार अशोकदादा साबळे यांचे सचिव म्हणूनही जबाबदारीने काम पाहिले. आपल्या प्रामाणिकपणा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली होती. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राविषयी त्यांना विशेष जिव्हाळा होता. ते उत्कृष्ट क्रिकेटपटू होते तसेच खो-खो या खेळाच्या विकासासाठीही त्यांनी योगदान दिले. नाट्यकलेवर त्यांचे विशेष प्रेम होते. रंगमंचावरील कलाकारांइतकीच पडद्यामागील कामांनाही त्यांनी महत्त्व दिले. अनेक नाट्यप्रयोग यशस्वी होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले.
याशिवाय माणगावमध्ये त्यांनी टुरिंग टॉकीज चालवून ग्रामीण भागातील नागरिकांना मनोरंजनाचे प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले. सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग कायम राहिला. राजाभाऊ शेलार यांच्या निधनाने माणगाव तालुक्याने समाजहितासाठी झटणारा, अभ्यासू, प्रामाणिक आणि सर्वांना आपलेसे वाटणारा कार्यकर्ता गमावल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




