Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़वाहतूक

आमडोशी गावातील महिला ठरली बळी 

छ. शिवाजी चौकातील नाक्यावर पिकअप जीपने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू 

छ. शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावरील अतिक्रमणाची आमडोशी गावातील महिला ठरली बळी 

छ. शिवाजी चौकातील नाक्यावर पिकअप जीपने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू 
प्रा. आ. केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने शव विच्छेदनासाठी विलंब 
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील नेहमी गजबजलेल्या छ. शिवाजी महाराज चौकातून हायवे नाक्याकडे जाणाऱ्या पिकअप जीपने स्कुटीला पाठीमागून धडक दिल्याने त्या स्कुटीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर पडली. त्यानंतर ती पिक अप जीप त्या महिलेच्या शरीरावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या श्रीमती अनिता अनंत जाधव (वय ५६) रा. आमडोशी या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी(दि.८) सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास नागोठण्यातील छ. शिवाजी चौक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पिक अप जीप चालक राजीव कुमार, रा. बिहार याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या अपघातासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार आमडोशी गावातील प्रवीण अनंत जाधव हा तरुण स्कुटीवर मागे बसलेली आपली आई अनिता जाधव हिच्यासह आमडोशी येथील आपल्या घरी जात असताना नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात त्याच्या स्कुटीच्या मागून आलेल्या पिक अप जीपने स्कुटीला धडक दिली. त्यामुळे खाली रस्त्यावर पडलेल्या अनिता जाधव यांच्या शरीरावरून जीप गेल्याने गंभीर जखमी झालेल्या अनिता जाधव यांना कोकणे हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार सदर पिक अप जीप ही रिलायन्स कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाच्या कामात कंत्राटी पद्धतीने लावण्यात आली असून या जीपचा मालक कोपरखैरणे येथील राहणारा आहे.
छ. शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमणामुळे घडलेल्या अपघातातील दुसरा बळी :-
नागोठण्यातील छ. शिवाजी चौक परिसरात यापूर्वी ६ नोव्हेंबर, २०२५ रोजी मोटरसायकलला एस टी ने कट मारल्याने मोटरसायकलवर मागे बसलेले देऊळवाडा – पाली येथील शांताराम दामा गायकवाड यांचा  रस्त्यावर पडून त्यांचा मृत्यू झाला होता. अशाचप्रकारे नागोठण्यातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला छ. शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळ निर्माण होऊन घडलेला हा दुसरा अपघात असून त्यामध्ये आमडोशी येथील या महिलेचा नाहक बळी गेला आहे. 
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने शव विच्छेदनासाठी हाल :- 
मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती आणि महत्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या नागोठणे प्रा. आ. केंद्रात गेल्याच महिन्यात एक एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी रुजू झाले आहेत. मात्र प्रकृती अस्वस्थेमुळे हे वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने या महत्वाच्या अशा प्रा. आ. केंद्रात दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना पाठविणे गरजेचे असतांनाच असा सक्षम अधिकारी आरोग्य केंद्रात नसल्याने शव विच्छेदनासाठी खुप वेळ थांबावे लागले. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. नंतर कोकबन प्रा.आ.केंद्रातून वैद्यकीय अधिकारी बोलविण्यात आले. 
रस्त्यावरील विक्रेत्यांवर ग्रामपंचायत कधी कारवाई करणार ?
नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या कडेला खेटून बसलेले भाजीवाले, हातगाडीवाले यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा होत असून पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले आहे.  नागोठणे ग्रामपंचायत प्रशासन या विविध प्रकारच्या व्यावसायिक धंदेवाल्यांकडून १० रुपयांची पावती रोज फाडत असल्याने रस्त्याकडेची जागा आपल्याच मालकीची असल्याचा समज या धंदेवाल्यांचा झाल्याचे चित्र नेहमीच दिसून येत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या या धंदेवाल्यांचे लाड ग्रामपंचायत प्रशासन अजून किती दिवस पुरविणार ? प्रशस्त भाजी मार्केट, मच्छी मार्केट इमारत असतांनाही रस्त्यावरील भाजी व मच्छी विक्रेत्यांना त्या इमारतींमध्ये का बसविण्यात येत नाही ? यामध्ये कुणाचे हितसंबंध आड येत आहेत असे अनेक प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होत आहेत.
दरम्यान या अपघाताच्या घटनेची माहिती समजताच  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी छ. शिवाजी महाराज चौक परिसरात झालेल्या अतिक्रमणांसंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही आवश्यक त्या सूचना केल्या. यामुळे खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र ते हॉटेल लेकव्ह्यू पर्यंतच्या मुख्य रस्त्यालगत असलेले सर्व दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे, रस्त्यालगतचे हातगाडी व भाजीविक्रेते यांनी दोन दिवसांत स्वतःहून  अतिक्रमणे दूर करून हा मुख्य रस्ता मोकळा करावा अन्यथा ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येईल अशी दवंडी दिली आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर ग्रामपंचायत प्रशासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!