E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
रस्ता झाला मातीचा व निसरडा
अपघातांच्या संख्येत वाढ : मोटारसायकल टेम्पो अपघातात तरुणाने गमावला जीव

रिलायन्स प्रकल्पाच्या कामांमुळे नागोठणे – पोयनाड रस्ता झाला मातीचा व निसरडा
अपघातांच्या संख्येत वाढ : मोटारसायकल टेम्पो अपघातात तरुणाने गमावला जीव
नागोठणे | महेश पवार
रिलायन्सच्या नागोठण्यातील विस्तारित प्रकल्प व बायोगॅस प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या मालवाहक अवजड वाहनांमुळे नागोठणे – पोयनाड हा रहदारीचा मुख्य रस्ता संपूर्ण लालेलाल मातीमय चिखलाने भरल्याने निसरडा झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र याचवेळी रिलायन्स व्यवस्थापनाला काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच मोटारसायकल व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील चालक गणपत महादु शिद, वय ३८, या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोटारसायकलच्या मागे बसलेला होणाजी गंगाराम पारधी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील एम जी एम रुग्णालयात नेण्यात आले आहे. हे दोघेही रा.कावेची वाडी, पो.शेणवई, ता.रोहा येथील रहिवासी आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.३) सायंकाळी ६.३० वाजण्याचे सुमारास नागोठण्याजवळील वेलशेत गावचे हद्दीत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे समोरील रस्त्यावर घडला आहे.

यासंदर्भात नागोठणे पोलिस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार गणपत महादु शिद हा त्याची काळया रंगाची शाईन मोटारसायकल पाठीमागे बसलेल्या होणाजी पारधी याच्यासह नागोठणे ते शिहू असे चालवत जात असताना शुक्रवार दिनांक ३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याचे सुमारास मौजे वेलशेत गावचे हद्दीत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे समोरील नागोठणे शिहू रस्त्यावर शिहू ते नागोठणे बाजूकडे भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने मोटरसायकलला समोरुन जोरदार ठोकर दिल्याने हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, चालक गणपत महादू शिद याला गंभीर स्वरूपाचा जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला होणाजी गंगाराम पारधी हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक जयराम गोविंद म्हात्रे वय ५२, रा. शिहू, पो.बेणसे ता.पेण याच्या विरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जी. डी. पावरा हे करीत आहेत.





