E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
दादांना खरी श्रद्धांजली
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप

रोह्यासारखा विकास खा. तटकरे साहेबांच्या माध्यमातून नागोठण्यात आणू हीच दादांना खरी श्रद्धांजली : किशोरभाई जैन
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप

नागोठणे | महेश पवार
माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाला अजितदादा नागोठण्यात आले आणि मी नागोठणे व विभागाच्या विकासावर केलेल्या माझ्या भाषणातील मुद्दे हेरून दादांनी अर्धे भाषण माझ्यावर केले. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याच्या हस्ते माझा प्रवेश झाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची ताकद व प्रशासकीय अभ्यास दादांकडे होता. खा. तटकरे साहेबांनी कधीच दादांची साथ सोडली नाही एवढी त्यांची घट्ट मैत्री होती हे सर्वांनी शिकण्यासारखे आहे. अजितदादा यांच्या निधनानंतर पवार कुटुंबियांना सोबत घेऊन तटकरे साहेबांनी पक्षाची एकजूट कायम ठेवली. दादांनी ज्याप्रमाणे बारामतीचा विकास केला तसाच विकास तटकरे साहेबांनी रोह्याचा केला आहे. त्यामुळे दादांकडे मी विकासाच्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या आता तटकरे साहेबांच्या माध्यमातून नागोठण्यात आणून रोह्यासारखा विकास नागोठण्यात घडवून आणू आणि तीच स्व. अजितदादांना खरी श्रद्धांजली असेल असे भावूक उद्गार राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन यांनी काढले.
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या पहिल्याच शासकीय जयंतीनिमित्त खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे व आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने नागोठणे शहर व विभागातील १० ग्रामपंचायती मधील २०० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात किशोरभाई जैन बोलत होते.

नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्या संकुलातील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शिवरामभाऊ शिंदे, भाई टके, सदानंद गायकर, मधुकर ठमके, विलास चौलकर, लियाकत कडवेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, चंद्रकांत गायकवाड, मनोहरभाई सुटे, सचिन कळसकर, संजयशेठ भोसले, शैलेश रावकर, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य अखलाक पानसरे, प्रकाश कांबळे, पूनम काळे, अमृता महाडिक, भाविका गिजे, राजेंद्र शिंदे, संजय काकडे, रुचिर मोरे, बिपीन सोष्टे, अतुल काळे, धनंजय जगताप, निवास पवार, कार्तिक जैन, राज जैन, मोरेश्वर तेलंगे, भोसले, अंकुश ताडकर, रोहिदास हातनोलकर, सुनील लाड, विजय शहासने, नरेश देवरे, प्रथमेश काळे, समीर भिकन, रोशन पारंगे, उमेर सांगडे, निष्ठा विचारे, प्रगती आवद, सुप्रिया डाकी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर व विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक तसेच नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर दिवंगत अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. याच कार्यक्रमात रोहा पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर, शिवरामभाऊ शिंदे, चंद्रकांत गायकवाड, विलास चौलकर, संतोषभाई कोळी आदींनी आपल्या मनोगतातून स्व. अजितदादा यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय सचिव राजेंद्र शिंदे यांनी केले.
शासनाने दादांना महापुरुषांच्या यादीत बसविले :- सदानंद गायकर
स्वर्गीय अजितदादा आज असते तर त्यांचा वाढदिवस आपण धूमधडाक्यात साजरा केला असता, मात्र दादांची जयंती साजरी करण्याची वेळ आज आपल्या सर्वांवर आली आहे. दादांच्या जयंतीच्या निमित्ताने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप आज आपण केल्याने विद्यार्थ्यांनी सायकलींचा वापर काळजीपूर्वक करावा असे आवाहन करतानाच दादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करून दादांना महापुरुषांच्या यादीत सन्मान दिल्याची भावना यावेळी रोहा पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे विभागीय नेते सदानंद गायकर यांनी व्यक्त केली.
अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही :- शिवरामभाऊ शिंदे
महाराष्ट्र राज्यात जे अनेक नेतृत्व होऊन गेले त्यामध्ये एक वाकबगार नेते म्हणून दादांची गणना केली जाते. दादांना आपला महाराष्ट्र खूप पुढे न्यायचा होता मात्र त्यांच्या जाण्याने आज अनेक कामे अपूर्ण राहिली आहेत. अजितदादा यांच्यासारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही. भविष्यात दादांच्या जयंती निमित्त असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा होतील अशी अपेक्षा रोहा पंचायत समितीचे माजी सभापती व विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवून दादांना श्रद्धांजली वाहू :- विलास चौलकर
किशोरभाई जैन यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश अजितदादांच्या हस्ते झाल्यानंतर दादांनीच त्याची रायगड जिल्हा परिषदेची उमेदवारी घोषित केली होती. दादा, हे सर्वांचे आधारस्तंभ होते. खासदार सुनील तटकरे साहेबांसह आपल्या सर्वांचा आधार गेला असून आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवून दादांना श्रद्धांजली वाहूया आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे असे कार्यक्रम किशोरभाई जैन यांनी घ्यावेत असे मनोगत नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण सुधागड मतदार संघाचे उपाध्यक्ष विलास चौलकर यांनी व्यक्त केले.




