E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़सहकार
अष्टविनायक पतसंस्था आशेचा आधार
अष्टविनायक पतसंस्था भविष्यात मतदारसंघ काबीज करेल : प्रकाशभाऊ देसाई

गरीब व गरजवंतांसाठी अष्टविनायक पतसंस्था आशेचा आधार : विलास चौलकर
अष्टविनायक पतसंस्था भविष्यात मतदारसंघ काबीज करेल : प्रकाशभाऊ देसाई
सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर
नागोठणे | महेश पवार
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्जासाठी अनेक कागदपत्रे मागितली जात असतानाच अष्टविनायक पतसंस्थेत कमीत कमी कागदपत्रांमध्ये ५० हजार रुपयांच्या तातडीच्या कर्जासह ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तातडीच्या कर्जामुळे अनेकांना आजारपणात व लग्नकार्यात मदत होऊन त्यांनी त्या कर्जाची परतफेडही केली. अशा प्रकारे गरीब व गरजवंतांसाठी अष्टविनायक पतसंस्था मदतीला धावून जात असल्याने त्यांच्यासाठी ही पतसंस्था आशेचा आधार म्हणून कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार श्री अष्टविनायक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काढले. यावेळी त्यांनी सभासदांसाठी ९ टक्के लाभांश जाहीर केला.

नागोठण्यातील आराधना भवन येथे शनिवारी (दि.२६) सायंकाळी विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून बळीराजा मुख्यमंत्री रस्ते व पालंद योजनेचे अध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देसाई, नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे, रायगड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुक्याचे अध्यक्ष महेंद्र पोटफोडे, नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीचे सभापती सदानंद गायकर, अष्टविनायक पतसंस्थेचे संस्थापक जयराम पवार, उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी, सचिव प्रफुल्ल नागोठणेकर, खजिनदार रतन हेंडे आदींसह सर्व संचालक, सभासद, अनेक मान्यवर व सत्कारमूर्ती यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि रविंद्र पारखे यांनी सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत तर राजिपचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर यांनी शासकीय नोकरीतील संधी व भरती प्रक्रिया याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.

श्री अष्टविनायक पतसंस्था पेण सुधागड विधानसभा मतदारसंघ काबीज करेल :– प्रकाशभाऊ देसाई
कोकणात सहकार क्षेत्र पाहिजे तसे रुजले नसतानाही आपल्या रायगड जिल्ह्यात कमळ नागरी सारख्या पतसंस्था नावारूपाला आल्या. पतसंस्थेचे कामकाज २८ वर्षे सांभाळणे सोपे नसतानाही श्री अष्टविनायक पतसंस्थेने योग्य पद्धतीने काम करीत आपले कार्यक्षेत्र नागोठणे विभागासह रोहा तालुक्यात विस्तारले आहे. त्यामुळे भविष्यात ही पतसंस्था पेण सुधागड विधानसभा मतदारसंघ काबीज करेल अशा शुभेच्छा भाजपाचे नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी आपल्या मनोगतात दिल्या.
श्री अष्टविनायक पतसंस्थेने सामाजिक बांधिलकीही जपली :– विलास चौलकर
श्री अष्टविनायक पतसंस्थेने पारदर्शक कारभार करतानाच नेत्र चिकित्सा शिबिर, वृक्षारोपण, कोरोना काळात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेली २५ हजार रुपयांची मदत अशा विविध बाबतीत सामाजिक बांधिलकीही जपली आहे. पतसंस्थेच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी अनेक विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करीत असतो. माझा पुतण्या अथर्व चौलकर हा पायलट झाला आणि त्याचा सत्कार करण्याची संधी मला पतसंस्थेच्या माध्यमातून मिळाली याचाही मला अभिमान आहे. आमच्या ग्राहकांना अखंडित सेवा देत, आमचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व संचालक मंडळ यांच्या सहकार्यामुळेच ही संस्था तज्ञपणे व यशस्वीपणे चालविताना आम्ही १५ कोटींच्या वर उलाढाल करून १२ लाख, ७५ हजार रुपये नफा व ७९ टक्के गुणांसह ऑडिट “अ ” वर्ग मिळविला आहे. संस्थेचे वसुली पथकही चांगले काम करीत आहे. विना सहकार, नाही उद्धार आणि एकीचे बळ, मिळते फळ… या तत्वाने चालल्यानेच पतसंस्था नावारूपाला आली. एकीच्या बळामुळेच मला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते. चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून संस्थेच्या कारभारात काही चुकीचे होत असल्यास व्यवस्थापिका व आमच्या निदर्शनास आणून द्या. कोणताही भ्रष्टाचार या पतसंस्थेत होऊ नये अशा प्रकारची बुद्धी आम्हाला परमेश्वराने द्यावी अशी प्रार्थनाही यावेळी विलास चौलकर यांनी मनोगत व्यक्त केली.

पतसंस्थेच्या वार्षिक सभेचे औचित्य साधून नागोठणे लायन्स क्लब अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विलास चौलकर, कमर्शियल पायलट झाल्याबद्दल अथर्व चौलकर, सेवानिवृत्त वनाधिकारी विकास जाधव, के एम जी विभाग गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष प्रमोद नागोठणेकर, कर्जाची परतफेड करणारा उत्कृष्ट कर्जदार हेमंत जंगम, पिग्मी एजंट राजेंद्र कृष्णा जोशी आदींसह गुणवंत विद्यार्थी व उल्लेखनीय कार्य केलेल्या अनेक व्यक्तींचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या सभेत व्यवस्थापिका शैला घासे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे, संचालक रोहिदास हातनोलकर यांनी वार्षिक अहवालाचे, प्रफुल्ल नागोठणेकर यांनी नफा – तोटा पत्रकाचे तर महादेवसिंग परदेशी यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले.

या संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोहिदास हातनोलकर यांनी केले. ही सभा यशस्वी होण्यासाठी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका शैला घासे, सर्व कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी सहकार्य केले.





