E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाटेक्नोलॉजीपूरमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

अंबा नदी होणार गाळमुक्त

पूरग्रस्त भागातील सरसकट पंचनामे करण्याचे आदेश 

नागोठण्यातील अंबा नदी होणार गाळमुक्त आणि विद्युत वाहिन्या होणार भूमिगत 

पूरपरिस्थिती आढावा बैठकीत नागोठण्याच्या संदर्भात खासदार सुनिल तटकरेंनी केल्या अनेक सूचना 
पूरग्रस्त भागातील सरसकट पंचनामे करण्याचे आदेश 
नागोठणे | महेश पवार
महाड येथील सावित्री नदीच्या धर्तीवर नागोठणे अंबा नदीचे नागोठणे ते कोलेटी पर्यंत खोलीकरण करून गाळ काढून संरक्षण भिंत बांधणे, विदयुत वितरण कंपनीने कानसई ते नागोठणे पर्यंत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे तसेच नागोठणे – वरवठणेला जोडणारा ऐतिहासिक जुना पुल तसाच ठेवुन नवीन पुलाचा बांधकामाचे अंदाजपत्रक काढण्याचे आदेश खासदार सुनिल तटकरे यांनी बांधकाम विभागाला दिले असल्याने लवकरच नागोठण्यातील अंबा नदी गाळमुक्त तर विद्युत वाहिन्या भूमिगत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे नागोठण्यातील छोटे छोटे पूर व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यापासून नागरिकांची भविष्यात सुटका होणार असल्याने नागोठणेकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या आदेशाने रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक ११ जुलै रोजी घेण्यात आली. या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनी नागोठण्यात नुकत्याच येऊन गेलेल्या पुरात व्यापारी व नागरिकांचे झालेले नुकसान तसेच पूरग्रस्त नागोठण्याच्या इतर अनेक बाबतीत व्यथा मांडली. त्यानंतर लगेचच रायगडचे खासदार, लोकनेते सुनील तटकरे यांनी पूरग्रस्त नागोठण्यातील विविध प्रश्नांवर उपस्थित अधिकाऱ्यांंना कडक शब्दांत सूचना केल्या. तसेच नागोठणे शहर व विभागातील  पूरग्रस्त नागरिकांचे सरसकट पंचनामे करा असे सक्त  आदेश यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले.
खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आमदार अनिकेतभाई तटकरे आणि जिल्हाधिकारी किसन जावळे, राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, रोहा  पंचायत समितीच्या सभापती सौ. विजयाताई पाशिलकर, उपसभापती संजय मांडलुस्कर, रोहा नगराध्यक्षा कुमारी वनश्री शेडगे, रोहा प्रांत ज्ञानेश्वर खुटवळ, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयराव मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस रोहा तालुका अध्यक्ष विनोदभाऊ  पाशिलकर, नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, रोहा पंचायत समिती सदस्य सौ. समृध्दी संतोष कोळी, राष्ट्रवादीचे नागोठणे विभाग अध्यक्ष संतोष कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके,
पंचायत समितीचे सर्व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व संबंधित विभागांकडून पूरपरिस्थिती, झालेल्या नुकसानीचा आढावा तसेच सुरू असलेल्या आणि प्रस्तावित मदतकार्याची सविस्तर माहिती खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी  घेतली. विविध विभागांमध्ये समन्वय साधून मदतकार्याला गती देण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी पूरग्रस्त भागांतील सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देत येत्या २ ते ३ दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
नागोठणे शहर व विभागातील ज्या नागरिकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले आहे त्या सर्व पूरग्रस्त नागरिकांच्या प्रत्येक कुटुंबाला ५ हजार रुपयांचे डोल तात्काळ देण्यात यावेत, नागोठणे व परिसरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ ५० हजार रुपये नुकसान भरपाई देणे असे आदेशही खासदार सुनिल तटकरे यांनी महसूल खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. शेकऱ्यांच्या शेतीवर जाऊन शेतीच्या राबांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावेत असा आदेश खासदार सुनिल तटकरे यांनी कृषि अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागोठण्यातील व्यापाऱ्यांच्या मालाचा विमा काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांना यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी चांगलेच धारेवर धरले आणि भविष्यात व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सूचना त्यांना केल्या.

रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांची बैठकीला दांडी : 

सर्व नुकसान भरपाईसाठी तसेच इतर विकासाच्या कामासाठी मुख्यमंत्री व इतर खात्याच्या मंत्र्याकडून व केंद्र सरकार कडून निधीची कमतरता भासू देणार नाही असे अभिवचन खासदार सुनिल तटकरे यांनी दिले. महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडे विकास निधीची काहीच कमतरता नाही परंतु तो निधी आणण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल असे खासदार सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांना पूरग्रस्तांचे गांभीर्य नसल्याचे किशोरभाई जैन यांनी खासदार सुनील तटकरे यांना पुराव्यानिशी दाखवून दिले. या बैठकीत आपला विषय निघू शकतो याची जाणीव झाल्यानेच या महत्वपूर्ण बैठकीस रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी दांडी मारल्याची चर्चा होत आहे. 
१९८९ च्या महापुराच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांनी नागोठणे व इतर पूरग्रस्त भागाला भेट देऊन स्वतः चालत पाहणी करून शासकीय यंत्रणा कामाला लावली त्याच प्रमाणे २००५ व २०२२ च्या पूरपरिस्थितीत देखील मी शासकीय यंत्रणा कामाला लावली असल्याचा खासदार उल्लेख यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्या कडून करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!