E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़धार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव
यंदा दुसऱ्या वर्षी भव्य धार्मिक सोहळा; विविध आध्यात्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन

इस्कॉन नागोठणेतर्फे ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव २०२६’चे आयोजन
यंदा दुसऱ्या वर्षी भव्य धार्मिक सोहळा; विविध आध्यात्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन
नागोठणे | महेश पवार
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) नागोठणे यांच्या वतीने ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदोत्सव २०२६’ या भव्य धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. नागोठणे येथे यंदा दुसऱ्या वर्षी या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम आराधना भवन, नागोठणे येथे दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत होणार आहे. कार्यक्रमामध्ये नगर संकीर्तन, अभिषेक दर्शन, भक्तिगीते, नृत्य, श्रीकृष्ण कथा व आध्यात्मिक प्रवचन, ५६ भोग अर्पण तसेच महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी इस्कॉन चौपाटी, मुंबई येथील कथाकार हिस ग्रेस कृष्ण गोविंद प्रभू यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे. श्रीकृष्ण भक्ती, आध्यात्मिक संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने इस्कॉन नागोठणे यांच्या वतीने या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इस्कॉन नागोठणेचे प्रमुख महाप्रभू निताई दास यांच्या वतीने नागोठणे व परिसरातील सर्व भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




