साईडपट्टीचे नुकसान सुरूच
मोठ्या अपघाताची शक्यता : ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई-गोवा महामार्गावर वायफाय केबलच्या कामामुळे साईडपट्टीचे नुकसान सुरूच
मोठ्या अपघाताची शक्यता : ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी


महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम आधीच संथ गतीने सुरू असताना, आता या केबलच्या कामामुळे वाहन चालकांच्या अडचणीत भर पडली आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाच्या दिवसांत ही उकरलेली साईडपट्टी व त्यामुळे पडलेले खड्डे दिसत नसल्यामुळे वाहने घसरून मोठ्या अपघातांची मालिका सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकून किरकोळ अपघात घडले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, संबंधित ठेकेदार केवळ आपले काम उरकून मोकळा होण्याच्या मागे आहे, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. रस्त्याचे एवढे नुकसान होत असताना संबंधित महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक का करत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एखादा मोठा अपघात होऊन कोणाचा नाहक बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, अशी विचारणा आता केली जात आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी :-
नियम धाब्यावर बसवून काम करणाऱ्या आणि महामार्गाची दुरवस्था करणाऱ्या संबंधित कंपनी व ठेकेदारावर तात्काळ गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाहन चालक आणि दुर्गम भागातील स्थानिकांनी केली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ पावले उचलून साईडपट्टीची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.




