E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटेक्नोलॉजीटॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
खा. सुनील तटकरे यांची भेट
सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध योजनांबाबत जनजागृती

महावितरणच्या नागोठण्यातील सेवा संकल्प अभियानास खा. सुनील तटकरे यांची भेट
सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध योजनांबाबत जनजागृती
नागोठणे | महेश पवार
महावितरण तर्फे संपूर्ण राज्यभर सौर ऊर्जा प्रकल्पातील योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती जास्तीत जास्त वीज ग्राहकांपर्यंत पोहोचावी आणि या योजनांचा लाभ वीज ग्राहकांना घेता यावा यासाठी महावितरण तर्फे नागोठणे येथे नुकतेच सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. नागोठणे ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला खासदार सुनील तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली.
खा. सुनील तटकरेंनी सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध योजनांची माहिती यावेळी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, भाई टके, महावितरणचे पेण येथील अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, रोहा येथील कार्यकारी अभियंता शैलेश महाजन, पाली येथील उपकार्यकारी अभियंता गणेश जाधव, नागोठण्याचे सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग आदींसह नागोठणेतील ग्रामस्थ व महावितरणचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

महावितरण कंपनीच्या पेण मंडळाकडून दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) ग्राहक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहक यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट योजना, प्रधानमंत्री सूर्य घर योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आदी योजनांसह सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत विविध योजनांची माहिती यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून नागोठण्यातील नागरिक व वीज ग्राहकांना देण्यात आली. तसेच शेती पंप ग्राहकांना कॅपॅसिटर जोडणी करण्याची विनंती यावेळी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.
१०० युनिट पेक्षा कमी वापर असलेल्या ग्राहकांचे वीज बिल होणार शून्य :-
महाराष्ट्रात गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनातर्फे महावितरणकडून ‘स्मार्ट’ पाऊल उचलले असून राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दिलासादायक योजना जाहीर केली आहे. ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप योजना’ (SMART योजना) अंतर्गत महावितरणने कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांना आपल्या घरावर सौर पॅनेल बसवण्यासाठी ८०% ते ९५% पर्यंत घसघशीत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या घरगुती वीज ग्राहकांचा मासिक वीज वापर १०० युनिटपेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे. यामुळे राज्यातील लाखो कुटुंबांचे विजेचे बिल शून्य होण्यास मदत होणार आहे.
लाभार्थ्यांचे वर्गीकरण आणि मिळणारी सूट:
योजनेच्या अटी व नियमांनुसार वेगवेगळ्या प्रवर्गासाठी खालीलप्रमाणे सूट देण्यात आली आहे :-
- १) दारिद्र्य रेषेखालील (BPL) ग्राहक:
- या ग्राहकांना तब्बल ९५% सूट मिळणार आहे.
- सौर पॅनेल बसवण्यासाठी ग्राहकाला केवळ २,५००/- रुपये भरावे लागतील.
- २) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहक:
- i) अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) ग्राहक: या प्रवर्गातील ग्राहकांना ९०% सूट दिली जाईल. त्यांना केवळ ५,०००/- रुपये भरावे लागतील.
- ii) सामान्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक: या ग्राहकांना ८०% सूट मिळणार असून, त्यांना केवळ १०,०००/- रुपये खर्च करावे लागतील.
योजनेचा लाभ कसा घ्यावा ?
या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र इच्छुक ग्राहकांनी खालील पद्धतींचा अवलंब करावा:
- आपल्या जवळच्या महावितरण (MSEDCL) कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती मिळवा.
- किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टल www.pmsuryaghar.gov.in (किंवा महावितरणच्या ग्राहक पोर्टलवर) जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा.
महावितरण तर्फे वीज ग्राहकांना आवाहन :–
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेशी सुसंगत असलेली ही राज्य सरकारची योजना महाराष्ट्राला ऊर्जेच्या बाबतीत अधिक ‘स्वयंपूर्ण’ बनवण्यासाठी आणि गरिबांच्या घरांवरील विजेचा भार हलका करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. पात्र नागरिकांनी जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन त्वरित आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.




