Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातकायदा व सुव्यवस्थानियुक्तीमध्य प्रदेशमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़

मुरावाडी क्रॉसिंग

महामार्गावरील क्रॉसिंग बंद केल्याने वाहनचालक व ग्रामस्थांचे हाल 

मुरावाडी क्रॉसिंग सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा 

महामार्गावरील क्रॉसिंग बंद केल्याने वाहनचालक व ग्रामस्थांचे हाल 
शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण ताडकर यांनी ना. भरतशेठ गोगावले यांचे वेधले लक्ष 
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील व नागोठणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या मुरवाडी तसेच कोंडगाव ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या  कोंडगाव व अनेक आदिवासी वाड्यांकडे येण्या – जाण्यासाठी असलेला मुंबई – गोवा महामार्गावरील महत्वाचा असा मुरवाडी क्रॉसिंग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मंगळवारी(दि.२८) अचानक बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, वाहनचालक व ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा क्रॉसिंग पूर्ववत सुरू न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण ताडकर यांच्यासह मुरावडी,  कोंडगाव व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख प्रवीण ताडकर, कोंडगाव मधील शिवसेना नेते विजय धामणे, एकनाथ राजिवले, नामदेव ताडकर, शशिकांत चोगले, मनोहर ताडकर, प्रफुल्ल ताडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मुंबई गोवा महामार्गावरून मुरावाडी, कोंडगाव या गावांसह कोंडगाव आदिवासी वाडी, कातळवाडी, पायरवाडी, एकाळघर, तळईवाडी, भपक्याची वाडी या आदिवासी वाड्यांकडे जाण्यासाठी महामार्गावर पूर्वी एक क्रॉसिंग ठेवण्यात आले होते. नागोठण्याकडे, मुंबई बाजूकडे जाण्यासाठी नागरिक व वाहनचालकांना तसेच महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला पश्चिमेला शेती असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्या येण्यासाठी या क्रॉसिंगचा खूप उपयोग होत होता. मात्र मंगळवारी अचानक हे क्रॉसिंग महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार महामार्गाच्या ठेकेदाराच्या कामगारांकडून भराव टाकून बंद करण्यात आले आहे. याठिकाणी भविष्यात अपघात घडू शकतात या कारणास्तव पोलिस प्रशासनाच्या सहकाऱ्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक उभारण्यास बंदी असतानाही अनेक ठिकाणी ते उभारले असल्याने ही क्रॉसिंग बंद करण्याची गरज काय असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.
मात्र असे असले तरी हा क्रॉसिंग बंद केल्याने मुरावाडी, कोंडगाव वरून पेण, मुंबई बाजूकडे जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटर पुढे मिरानगर येथे असलेल्या अंडरपास पुलाखालून तसेच नागोठण्याहून मुरवाडीला येण्यासाठी निडीफाटा येथे आलेल्या क्रॉसिंगला एक किलोमीटरचा वळसा घालून यावे लागणार आहे. तसेच महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूला असलेल्या शेतात गुरे, नांगरणी मशीन घेऊन ये जा करण्यासाठीही शेतकऱ्यांना, मच्छीमार बांधवांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मुरावाडी, कोंडगाव परिसरातील सुमारे ३ हजारांच्या वर नागरिकांना याचा त्रास होणार असून नागोठण्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या हायस्कुल व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही क्रॉसिंग बंद केल्याचा त्रास होणार आहे.
(सर्व्हिस रोडवरील खड्डे दाखविताना प्रवीण ताडकर)
दरम्यान यासंदर्भात तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ३० मीटर अंतरात क्रॉसिंग ठेऊन तेथे झेब्रा क्रॉसिंग ठेवण्याच्या सूचना २०२४ मध्ये केलेल्या पाहणी दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच खा. सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊन तसेच ना. भारतशेठ गोगावले यांनी दोन वेळा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सांगितले होते.  याशिवाय बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांच्या महामार्ग पाहणी दौऱ्यात या क्रॉसिंगची नितांत गरज असल्याचे ग्रामस्थांनी त्यांना सांगितले होते. याशिवाय आमदार महेंद्रशेठ दळवी यांनीही जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना पत्रव्यवहार करून ही क्रॉसिंग मोकळी ठेवण्याच्या सूचना पत्रव्यवहार करून दिल्या होत्या. मात्र असे असूनही महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाने या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच मुरावाडी क्रॉसिंग बंद केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच याप्रकरणी ना. भरतशेठ गोगावले यांनी लक्ष घालण्याची विनंती विभाग प्रमुख प्रवीण ताडकर यांनी केल्याने आता याप्रकरणी कोणता निर्णय होतोय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!