वार्षिक सभेचे शनिवारी आयोजन
कर्तृत्ववान मान्यवर व गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या २८ व्या वार्षिक सभेचे शनिवारी आयोजन
कर्तृत्ववान मान्यवर व गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील नावाजलेल्या अशा श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शनिवार दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता नागोठण्यातील जैन मंदिरासमोरील आराधना भवन येथे पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे सचिव प्रफुल्ल नागोठणेकर यांनी दिली.
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला बळीराजा मुख्यमंत्री रस्ते व पालंद योजनेचे अध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देसाई, नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे, रायगड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र पोटफोडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या वार्षिक सभेत इतिवृत्त वाचून कायम करणे, वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, कायदा व नियम यास अनुसरून नफा विभागणीस मान्यता देणे, लाभांश जाहीर करणे, गेल्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय खर्चाची माहिती देणे व येत्या आर्थिक वर्षाकरिता अंदाजपत्रकास मान्यता देणे यांसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्व साधारण सभेनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व विशेष कर्तृत्व केलेल्या मान्यवर व्यक्तींसह नागोठणे शहर व परिसरातील शाळांमधील इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह व इतर उच्च शिक्षण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन पतसंस्थेच्या व्यवस्थापिका शैला घासे व संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.





