Uncategorized
योग गुरुकुल अकॅडमीचा तृतीय वर्धापनदिन
विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान

योग गुरुकुल अकॅडमीचा तृतीय वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान
नागोठणे | महेश पवार
योगाच्या माध्यमातून निरोगी, आनंदी आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या योग गुरुकुल अकॅडमी नागोठणे या अकॅडमीचा तृतीय वर्धापनदिन सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

गेल्या तीन वर्षांपासून योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि विविध योगासनांच्या माध्यमातून महिला वर्गामध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य योग गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुरू आहे. अकॅडमीच्या या उपक्रमाला दिवसेंदिवस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक महिला नियमितपणे योगाभ्यासाचा लाभ घेत आहेत.या वर्धापनदिन सोहळ्यात योगाभ्यासावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिला व योगसाधकांनी आपल्या उत्कृष्ट योगकौशल्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

योगगुरू यामिनी माळी-दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीमध्ये योगाचे शास्त्रशुद्ध व सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जात असून, योगाच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. महिला सक्षमीकरण आणि आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात अकॅडमीचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
वर्धापनदिनानिमित्त नागोठण्यातील मायालक्षमी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील पाटील, बाॅडीसेफ एक्वापमेंट मालक सुभाष माळी, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक नंदकुमार मरावडे, शिक्षिका शिल्पा मरवडे, बाॅडीसेफ फिटनेस जीमचे मालक मंगेश सानप, सुशील दिघे, हेमंत सानप,नागमणी मॅचेट्टी, नागोठणे ग्रा.पंचायत सदस्या पूनम काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.




