E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
खा. सुनील तटकरे शनिवारी नागोठण्यात
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत संबंधित अधिकारी व ठेकेदाराला उपस्थित राहण्याचे आदेश

रखडलेल्या नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेची खासदार सुनील तटकरे शनिवारी स्वतः करणार पाहणी
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत संबंधित अधिकारी व ठेकेदाराला उपस्थित राहण्याचे आदेश
रिलायन्स कंपनीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याची नागोठणेकरांची मागणी
नागोठणे | महेश पवार
नागोठणे आणि नागोठणेकरांवरील प्रेमाखातर एक विशेष बाब म्हणून गेल्या अनेक वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेली व अपूर्ण अवस्थेत असलेल्या नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी स्वतः भेट देणार आहेत. अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी घेण्यात आलेल्या बैठकीत नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना योजनेशी संबंधित सर्व अधिकारी तसेच योजनेचे ठेकेदार यांनाही उपस्थित राहण्याच्या आदेश खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील “राजस्व” सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीला खासदार सुनील तटकरे यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन ढोले, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकरशेठ पाटील, राष्ट्रवादीचे नेते भाई टके, किशोरभाई जैन, नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच विलास चौलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठण्यातील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागोठणे शहराला गेल्या काही दिवसांपासून होत असलेला अशुद्ध व माती मिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा आणि त्यासंदर्भात काही स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये याविषयी आलेले वृत्त याची दखल घेत खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सुरुवातीस अन्य खात्यांचा कारभार यशस्वीपणे सांभाळणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे त्यावेळी अर्थ मंत्रीपदाचा कार्यभार आल्यानंतर खा. सुनील तटकरे यांनी नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत एक विशेष बाब म्हणून ६ कोटी ३८ लाख २५ हजारांची शुद्ध पाणी पुरवठा योजना नागोठण्यासाठी मंजूर करून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या साठवण टाकीसाठी सुमारे एक कोटी साठ लाख रुपयांचा निधीही मंजूर करून ती टाकीही नागोठण्यातील शृंगार तलावाच्या बाजूला बांधण्यात आली. अशाप्रकारे योजनेवर सुमारे ८ ते ९ कोटी रुपये खर्च होऊनही काही कारणास्तव ही शुद्ध पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहून नागोठणेकरांना आजही नियमित अशुद्ध पाणी तसेच पावसाळ्यात तर माती मिश्रित गढूळ पाणी मिळत असल्याने नागोठणेतील नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान खासदार सुनील तटकरे योजनेतील जलशुद्धीकरण प्रकल्पाची स्वतः पाहणी करण्यासाठी येणार असल्याने शुद्ध पाण्याच्या बाबतीत नागोठणेकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
रिलायन्स कंपनीने नागोठण्याला शुद्ध पाणीपुरवठा देण्याची मागणी :-
नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास, या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र, त्या ठिकाणी लागणारे ऑपरेटर, इलेक्ट्रिशन, वॉचमन असे पाच ते सहा कामगार, जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचा खर्च, वीज देयकाचा खर्च अशाप्रकारे नियमित मासिक खर्च करण्यास नागोठणे ग्रामपंचायत सक्षम आहे का ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळेच नागोठणे ग्रामपंचायतीने प्रायोगिक तत्त्वावर ही योजना नागोठणे शहरात स्टँड पोस्टद्वारे सुरू करूनही जलशुद्धीकरण केंद्रात झालेल्या तांत्रिक बिघाडामळे नंतर दोन-चार महिन्यातच योजना ठप्प झाली. सद्यस्थितीत नागोठण्याच्या नावाने ओळखला जाणारा अंबानी समूहाचा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या नवीन प्रकल्पाचे सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या विस्तारीकरणाचे काम पाच ते सहा वर्षे चालणार आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने आलेल्या व नागोठण्यात राहणाऱ्या कामगारांचा वाढता ताण नागोठणे ग्रामपंचायतीवर येत आहे. मात्र रिलायन्स प्रकल्प नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत येत नसल्याने रिलायन्स कंपनीचा कोणताही उपयोग नागोठणेकरांना होताना दिसून येत नाही. त्यामुळे किमान नागोठणेकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा तरी रिलायन्स कंपनीने करावा अशी ही मागणी जोर धरू लागली आहे.




