E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यटॉप न्यूज़महाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

सांडपाणी नागोठण्यातील मुख्य रस्त्यावर 

रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर ; रहिवाशांची ग्रामपंचायतीकडे धाव

सार्वजनिक गटार बुजविल्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी नागोठण्यातील मुख्य रस्त्यावर 

रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर ; रहिवाशांची ग्रामपंचायतीकडे धाव
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील शांतीनगर भागातील जांबेकर बिल्डिंगसमोरील सार्वजनिक गटार काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे बुजवल्यामुळे इमारतीमधील सांडपाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाला आहे. या प्रकारामुळे गटारातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात नागोठण्यातील मुख्य रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, संतप्त रहिवाशांनी नागोठणे ग्रामपंचायतीकडे लेखी अर्जाद्वारे दाद मागितली आहे. या सांडपाण्यामुळे पादचारी आणि दुचाकी वाहनचालक यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शांतीनगर भागातील जांबेकर बिल्डिंगमधील रहिवाशांच्या इमारतीचे सांडपाणी समोरील रस्त्याच्या पूर्व बाजूला असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गटारात पाईपद्वारे सोडण्यात आले होते. मात्र, शेजारील इमारतीत राहणाऱ्या दोन व्यक्तींनी ‘गटाराच्या पाण्याचा वास मारतो’ असे कारण पुढे करत, कोणतीही पूर्वसूचना न देता जेसीबीच्या सहाय्याने हे संपूर्ण गटार बुजवून टाकले असल्याचे जांबेकर बिल्डींग नागरिकांचे म्हणणे आहे. 
महत्त्वाची बाब म्हणजे सदर गटार हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (P.W.D.) अखत्यारीत येते. हे गटार बुजवल्यामुळे आता सांडपाणी रस्त्यावर येऊन आजूबाजूच्या नागरिकांना याचा मोठा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित गटार बुजवणाऱ्या व्यक्तींवर राहील, असा इशारा रहिवाशांनी आपल्या तक्रारी अर्जातून दिला आहे.
याप्रकरणी जांबेकर बिल्डिंग मधील भूषण संतोष जांबेकर, सुरेश रघुनाथ जांबेकर यांच्यासह इमारतीमधील मनोहर जाधव, ज्ञानेश्वर मुंडे, राहुल हळदे, गोरख कामठे, अजिंक्य जांबेकर, रचना गंधे, उमेश जयस्वाल आणि विनोद पारंगे या रहिवाशांनी स्वाक्षऱ्यांनिशी नागोठणे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या अर्जाची एक प्रत सार्वजनिक बांधकाम खाते, रोहा यांच्याकडेही माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.
बुजवलेल्या गटाराची तात्काळ पाहणी करून सांडपाण्याचा मार्ग मोकळा करावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करून रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर तक्रारी अर्ज रहिवाशांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायती मध्ये ‘दाखल’ केल्याची नोंद आहे. शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी तक्रारदार रहिवाशांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे व ग्रामपंचायत अधिकारी गोविंद शिद यांची भेट घेतली असता, याप्रकरणी माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!