नागोठण्यात श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न
संतांच्या वेशभूषेतील मुले दिंडीतील आकर्षण

नागोठण्यात श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न
संतांच्या वेशभूषेतील मुले दिंडीतील आकर्षण
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील कुंभारआळी येथील श्री गणपती – हनुमान मंदिरात कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा दरवर्षी प्रमाणे यावर्षीही बुधवार दि. १५ एप्रिल रोजी कुंभार समाज बांधवांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या दिंडीत संतांच्या वेशभूषेतील मुले आकर्षण ठरली. 
कुंभारआळी येथील श्री गणपती – हनुमान मंदिरात कुंभार समाजाच्या वतीने आयोजित श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या सोहळ्यास राजिपचे सदस्य सुमितदादा काते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते नरेंद्र जैन, भाई टके, किशोरभाई जैन, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया संजय महाडिक, राजिपचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, बाळासाहेब टके, ग्रामपंचायत सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, संतोष नागोठणेकर, सदस्या अमृता महाडिक, ज्योती राऊत यांच्यासह नागोठणे शहर व परिसरातील मान्यवरांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.

श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात उन्नती महिला मंडळ, कुंभारआळी यांच्याकडून सकाळी पाच वाजता घेण्यात आलेल्या काकड आरतीने झाली. त्यानंतर सकाळी आठ वाजता ग्रामस्थ मंडळ कुंभारआळी यांच्याकडून कलश स्थापना करण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता ग्रामस्थ मंडळ कुंभार आळी यांच्या वतीने दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संत महंतांच्या विविध वेशभूषा व वस्त्रे अलंकार परिधान केलेल्या लहानग्यांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभाग घेतला होता. सकाळी १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान संत सेवा मंडळ नागोठणे यांच्याकडून भजन घेण्यात आले. तदनंतर दुपारी बारा वाजता संत गोरोबाकाका यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दुपारी तीन वाजता श्री व सौ पूजा किरण नागोठणेकर यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ नागोठणे यांच्या वतीने गायक प्रफुल्ल नागोठणेकर व तबलजी कौस्तुभ दिवेकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगीत भजन सादर केले. त्यानंतर श्री दत्त सेवा हरिपाठ मंडळ, वरप त्यांच्याकडून हरिपाठ घेण्यात आले. त्यानंतर रात्री ८ वाजता उपस्थित नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर खोपोली येथील कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या कीर्तन सेवेने या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. श्री संत गोरोबाकाका यांचा हा पुण्यतिथी सोहळा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थ मंडळ व उन्नती महिला मंडळ, कुंभारआळी यांनी अपार मेहनत घेतली




