E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआंदोलनकामगार क्षेत्रकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़
भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचा एल्गार

रिलायन्स कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळण्यासाठी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचा एल्गार
प्रकल्पग्रस्तांचा २ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
३१ मे रोजी आंबेघर येथे आंदोलनाची ठरणार रणनीती
नागोठणे | महेश पवार
रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) कंपनीतील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन मध्ये कायमस्वरूपी नोकरीत घेण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि रिलायन्स व्यवस्थापनाला दिले होते. असे असतानाही या आदेशाची कोणतीही अंमलबजावणी न करता केवळ वेळकाढू धोरण अवलंबिणाऱ्या रिलायन्स व्यवस्थापन व जिल्हाधिकारी प्रशासनाच्या विरोधात अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २ जून पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसण्याचे ठरविल्याने भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचा एल्गार पाहण्यास मिळणार आहे.

भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था -चोळे ते नागोठणे यांच्या माध्यमातून रिलायन्स कंपनीतील प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक यांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी या संदर्भात आय.पी.सी. एल./रिलायन्स नागोठणे येथील कंपनीत कायमस्वरूपी नोकरी पासून वंचित राहिलेल्या ३२४ प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना न्याय मिळण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दि.२४ जून, २०२५ रोजी मंत्रालय– मुंबई येथे बैठक झाली होती. त्या बैठकीच्या इतिवृत्त पत्राच्या अनुषंगाने व महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीचे आदेशाने ३२४ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरीत घेण्याचे लेखी आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी रायगडच्या जिल्हाधिकारी व रिलायन्स कंपनीच्या व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयातून दिले होते.
(प्रकल्पग्रस्तांच्या मुंबई आझाद मैदान येथील आंदोलनाचा संग्रहित व्हिडिओ)
शासकीय आदेशाचे पालन रिलायन्स नागोठणे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी करत नसल्याने प्रकल्पग्रस्ताना नोकरीत घेण्यास चाल ढकलपणा व आडमुठेपणाचे धोरण रिलायन्स कंपनी अधिकारी घेत असल्याने मंगळवार दिनांक २ जून, २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आता रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
दरम्यान रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या बेमुदत उपोषणाच्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी रविवार दिनांक ३१ मे, २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ४:३० वाजता शिवराय कार्यालय, आंबेघर येथे सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला सर्व प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिणमिने, उपाध्यक्ष रोशन जांबेकर, सचिव राकेश जवके यांनी केले आहे.




