E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
नागोठणे बाजारपेठेत रक्षाबंधनाचा उत्साह
बाजारपेठ मधील दुकाने आकर्षक राख्यांनी सजली

नागोठणे बाजारपेठेत रक्षाबंधनाचा उत्साह
बाजारपेठ मधील दुकाने आकर्षक राख्यांनी सजली
नागोठणे | महेश पवार
बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण असलेला रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नागोठणे बाजारपेठेत मोठी लगबग पाहायला मिळत आहे. येथील बाजारपेठेतील दुकाने विविध प्रकारच्या, रंगीबेरंगी आणि आकर्षक राख्यांनी पूर्णपणे सजली असून, राख्या खरेदी करण्यासाठी महिलांची आणि तरुणींची बाजारात मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा बाजारपेठेत चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच वेगवेगळ्या डिझाईन्सच्या राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांसाठी आवडते कार्टून, कॅरेक्टर्स जसे की छोटा भीम, डोरेमॉन, स्पायडरमॅन आणि लाईट्स असणाऱ्या राख्यांना मोठी मागणी आहे. तर मोठ्या भावांसाठी रेशमी धागे, जरीचे काम केलेल्या, चांदीचा कोट असलेल्या, तसेच खडे आणि मोत्यांच्या आकर्षक राख्यांनी सजलेली नागोठणे बाजारपेठेतील दुकाने महिला व तरुणींच्या गर्दीने ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे.

महिला व तरुणी ग्राहक आपल्या लाडक्या भावासाठी खास राखी निवडण्यात मग्न आहेत. महागाईचा थोडाफार परिणाम जाणवत असला, तरी सणाचा उत्साह कायम असून खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची चांगलीच रेलचेल दिसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे.
“रक्षाबंधन सणानिमित्त तीन दिवसांपूर्वी राखीचे दुकान लावण्यात आले असून तेव्हापासून राखी खरेदीसाठी महिला, तरुणींचा उत्तम प्रतिसाद आहे. दहा रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत किंमतीच्या सुमारे २०० प्रकारच्या विविध राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत” – राकेश अरविंद जावरे, राखी विक्रेता – नागोठणे




