E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातआरोग्यमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

अंबा नदी झाली मैली

मुसळधार पावसामुळे माती मिश्रित पाणी आल्याची शक्यता

अंबा नदी झाली मैली : के. टी. बंधाऱ्यातून लालसर पाण्याचा पुरवठा

मुसळधार पावसामुळे माती मिश्रित पाणी आल्याची शक्यता
नागोठणे | महेश पवार
येथील आंबा नदी मधून लालसर रंगाचे माती मिश्रित पाणी वाहत असल्याची धक्कादायक बाब बुधवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली आहे. अंबा नदीचे संपूर्ण पात्र लाल रंगाच्या पाण्याने व्यापून गेल्याने हे पाणी नक्की कशामुळे आले हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच के टी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधूनही हेच पाणी, या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व गावांना पुरविण्यात  येत असल्याने त्या माती मिश्रित पाण्यामुळे सर्व नागरिक, विशेषता महिला त्रस्त झाल्या आहेत. 
अंबा नदीच्या वरील भागात गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून आणि परिसरातून वाहून आलेल्या मातीमिश्रित पाण्यामुळे अंबा नदीतील पाण्याचा रंग पूर्णपणे लालसर झाला असून नदीला एका प्रकारे ‘मैली’ स्वरूप आले आहे. त्यामुळे अंबा नदीचे हे पाणी कमालीचे दूषित झाले आहे. या प्रदूषित पाण्याचा पुरवठा थेट के. टी. बंधाऱ्यातून जलवाहिन्यांद्वारे संपूर्ण परिसरात होत असल्याने नागरिक तीव्र संताप व चिंता व्यक्त करत आहेत.
सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा व त्यावरील भागात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर माती नदीच्या पात्रात वाहून आली. त्यामुळे नदीचे पाणी लाल रंगाचे झाले असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. मात्र असे असले तरी याच के. टी. बंधाऱ्यातून नागोठणे शहर आणि परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या जलवाहिन्यांतून नागरिकांच्या घराघरांमध्ये लाल रंगाचे, मातीमिश्रित पाणी येत असल्याने लोकांचे हाल होत आहेत.
घरांमधील नळांना येणारे हे पाणी इतके गढूळ आणि घाणेरडे आहे की, ज्या पाण्याकडे साधे डोळे उचलून बघता येत नाही, ते पाणी पिण्यासाठी वापरणे तर दूरच, साधे आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी तरी कसे वापरावे, असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या गंभीर समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाने तात्काळ पाणी शुद्धीकरण करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!