E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआंदोलनआरोग्यमध्य प्रदेशमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याचा कुटील डाव

नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे व ग्रामस्थांनी केला तीव्र विरोध 

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणीला स्थलांतरित करण्याचा कुटील डाव !

नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे व ग्रामस्थांनी केला तीव्र विरोध 
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भाड्याच्या जागेत स्थलांतर ? 
दुरुस्तीसाठी पैसे नसल्याने भाड्यासाठी पैसे देण्यासाठी आर्थिक साटेलोटे ?
नागोठणे | महेश पवार
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामा संदर्भात अद्याप कोणत्याही बाबतीत ठावठिकाणा नसतानाच नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक बाबतीत गैरसोय असल्याचे कारण पुढे करीत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणी–आमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या इमारतीत हलवण्याचा कुटिल डाव शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. तसे पत्रच रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच पाठविण्यात आल्याने नागोठण्यात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकाराला नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी आरोग्य केंद्रात शुक्रवार दिनांक २२ मे रोजी सकाळी बैठक घेऊन तीव्र विरोध केला आहे. 
याबाबतीत रोहा पंचायत समितीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर भाड्याच्या जागेत करण्यासंदर्भात आणि नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे हस्तांतर सदरच्या इमारतीत करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी करणारे पत्र दिनांक १८ मे , २०२६ रोजी सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या व्यवस्थापनाला पाठविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र वांगणी–आमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेम कंपनीची इमारत भाड्याने घेऊन नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र तेथे हलविण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुढे केले जात असतांनाच शासनाकडे भाड्यासाठी पैसे आहेत का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे दुसऱ्या इमारतीचे भाडे भरण्यासाठी तयारीत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या प्रकरणी काही आर्थिक साटेलोटे असल्याची उलट सुलट चर्चाही नागोठण्यात सुरू झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती व महत्वाचे असलेले नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला ठाम विरोध करण्यासाठी नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी प्रखर विरोध करीत राजिपच्या आरोग्य खात्याला  पत्रव्यवहार सुरू केला केला आहे. याचाच एक भाग म्हणून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी(दि.२२) सकाळी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तात्पुरत्या नियुक्तीवर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता नाईक यांच्याशी सरपंच सुप्रियाताई महाडिक व उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी महत्वपूर्ण बैठक घेऊन नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र हलविण्याच्या प्रकाराला तीव्र विरोध केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर, सचिन ठोंबरे, सदस्या शबाना मुल्ला, ज्योती राऊत, सुनील लाड, नंदा गायकवाड, बाबू घाग आदींसह ग्रामस्थ आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेले नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक बाबतीत ग्रामपंचायत प्रशासन वेळोवेळी सहकार्य करीत आलेली आहे. जर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र हलविले तर मध्यवर्ती नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या संख्येने  येणारे आजुबाजूच्या गावातील, आदिवासी वाड्यातील रुग्ण, गरोदर माता तपासणी, बालकांचे लसीकरण आदी विविध बाबतीत रुग्णांचे हाल होणार आहेत. तसेच त्यांना इतर ठिकाणी जाण्यासाठी खासगी रिक्षा करून जावे लागणार असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच अनेकवेळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसलेली औषधे बाहेरील मेडिकल स्टोअर मधून आणून ती लगेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासावी लागतात. त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र गेल्यास अशा अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.
राजिपच्या आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र हस्तांतर करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक यांनी केलेल्या पत्रव्यवहारानुसार रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका साळुंके यांनी शुक्रवारीच दुपारी नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन सरपंच सुप्रियाताई महाडिक व उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यासोबत नागोठण्यातील पर्यायी जागेसंदर्भात  चर्चा केली आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!