कुमारी सानवी खांडेकर हिला “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार
कुमारी सानवी हिचे सर्वत्र अभिनंदन

कुमारी सानवी खांडेकर हिला “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार
कुमारी सानवी हिचे सर्वत्र अभिनंदन
नागोठणे | महेश पवार
मार्शल आर्टस् स्पोर्टस् एकॅडमी रायगड यांच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा पेण येथे नुकताच संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्रातील क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक,अध्यात्मिक, वैद्यकीय, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात नागोठण्याजवळील पाले (पो . मेढा) येथील कुमारी सानवी संदीप खांडेकर हिला क्रीडा क्षेत्रातील कराटे प्रकारात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल “महाराष्ट्र रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कुमारी सानवी खांडेकर रोहा येथे शिक्षण घेत असून ती लहानपणापासून व गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. तिने जिल्हा व राज्य स्तरावरील विविध कराटे स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पदके मिळविली आहेत. तिच्या या कार्याची दखल घेऊनच कुमारी सानवी खांडेकर हिला ह. भ. प. मारुती महाराज कोल्हटकर यांच्या हस्ते “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या रोहा तालुका अध्यक्षा प्रीतम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुमारी सानवी खांडेकर हिला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




