Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
Uncategorized

एक झाड लावून त्याचे जतन करा

पळस हायस्कूल परिसरात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे जतन करा : ला. विलास चौलकर

पळस हायस्कूल परिसरात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप
वृक्षारोपणासाठी आदर्श पतसंस्थेचे सहकार्य
नागोठणे | महेश पवार
पळस विद्यालय म्हणजे सुंदर गणवेश असलेल्या विद्यार्थ्यांची शाळा असून आज या कार्यक्रमाला ज्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या बागेतून सुंदर पुष्पगुच्छ तयार केले त्या मुलांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, ही शिकवण घेऊन चांगले विचार मनात येण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे.  झाडे ही कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात तर  आपल्याला ऑक्सिजन देतात.  त्यामुळे झाडे लावणे आवश्यक आहे.  नागपूर मध्ये नेहमी असणारे ४५ अंश तापमान यावर्षी आपल्या नागोठणे परिसरात आढळले. पळस विद्यालयाच्या आवारात आम्ही प्रायोगिक स्वरूपात ५ झाडे लावली आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यानेही आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून आईप्रमाणे त्यांचे संगोपन करा, जोपासना करा असे भावनिक आवाहन नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी केले.
आदर्श सरकारी पतसंस्थेने वृक्षारोपणाचा एक चांगला उपक्रम सुरू करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला  आहे. संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण करण्यात येणाऱ्या  ६ हजार झाडांमधून १ हजार झाडे जरी चांगल्या प्रकारे जगली तरी हा उपक्रम यशस्वी झाल्याचे सिद्ध होईल. यासाठी पळस विद्यालयाच्या आवारात  लावलेली ही झाडे आम्ही पुन्हा बघायला येऊ.  पळस विद्यालयातील विद्यार्थी गुणवंत आहेत, ते नक्कीच या झाडांची जोपासना करतील. या शाळेसाठी नागोठणे  लायन्स क्लबने यापूर्वीही खूप काही दिले आहे व शिक्षकांनी आवश्यक गरज सांगितल्यास यापुढेही देऊ  :– लायन विलास चौलकर
लायन्स क्लब, नागोठणे यांच्या वतीने आणि आदर्श नागरी पतसंस्था मर्यादित, अलिबाग यांच्या नागोठणे शाखेच्या सहकार्याने नागोठण्याजवळील पळस येथील पी एन पी माध्यमिक विद्यालयाच्या आवारात  सोमवारी(दि.२०) सकाळी आयोजित केलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला त्यावेळी विलास चौलकर बोलत होते.
यावेळी नागोठणे लायन्स क्लबच्या वतीने पी एन पी माध्यमिक विद्यालय, पळस मधील ८ वी ते १० पर्यंतच्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. तो राखण्यासाठी मी १० झाडे तरी जगवेन अशी प्रतिज्ञा सर्वांनी घेऊया, तरच आपली भावी पिढी सुखाने जगेल. ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढत आहे. ऑक्सिजन देणारी झाडे आपण विद्यालयाच्या आवारात लावली आहेत त्याची निगा राखून ती झाडे जगवा  :- विवेक सुभेकर
पर्यावरणाचा विचार करता आदर्श पतसंस्थेने एक मोठे पाऊल उचललं आहे. पतसंस्थेने रायगड जिल्ह्यात ६ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. लायन्स क्लब प्रमाणेच आदर्श पतसंस्था रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा शिबिर यांसह विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहे. झाडांचे संगोपन ही आमच्या  पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांची  इच्छा असून आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावरही नुकतीच वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आमच्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमात तुमची मोलाची साथ मिळाल्याबद्दल नागोठणे लायन्स क्लब व पळस माध्यमिक विद्यालयाचे आभार :– पूर्वा वैद्य, व्यवस्थापिका – आदर्श पतसंस्था
या कार्यक्रमाला नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास चौलकर, एम जे एफ लायन यशवंत चित्रे, एम जे एफ लायन विवेक सुभेकर, एम जे एफ लायन सुधाकर जवके, नागोठणे लायन्स क्लब सदस्य विजय शहासने, संतोष शहासने, सौ. अनुराधा शहासने, आदर्श पतसंस्थेच्या व्यवस्थापिका पूर्वा वैद्य, आदिती पाटील, राजिप  नागोठणे केंद्र प्रमुख सुनील मोंढे, पळस विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष गजानन भोईर, माजी अध्यक्ष गणपत डाकी, मुख्याध्यापक लक्ष्मण मोकल, शिक्षिका सायली ठाकूर, समीक्षा यादव, प्रेरणा शेळके आदींसह विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यशवंत चित्रे, केंद्रप्रमुख सुनील मोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सुभेकर व शिक्षिका प्रेरणा शेळके यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!