E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़वाहतूक
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
सरपंच सुप्रियाताई महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे व सदस्यांचा कारवाईत सहभाग

नागोठणे ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू : उर्वरित कारवाई सोमवारी होणार
सरपंच सुप्रियाताई महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे व सदस्यांचा कारवाईत सहभाग
नागोठणे | महेश पवार
नागोठणे ग्रामपंचायतीने या आधीच ठरविल्याप्रमाणे शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. या अतिक्रमण हटाव मोहिमेत येथील विशाल मेडिकल स्टोअर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतची अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली. उर्वरित अतिक्रमण धारकांनी त्यांनी केलेली अतिक्रमणे स्वतःहून दूर करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे अन्यथा सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट पासून इतर अतिक्रमणांवरही कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक यांनी दिला आहे.

नागोठणे ग्रामपंचायत अंतर्गत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, कोळीवाडा व इतर विविध भागातील रस्त्यावर बसणारे भाजी विक्रेते, मच्छी विक्रेते तसेच काही जणांनी आपापल्या दुकानांसमोर, गाळ्यांसमोर केलेले अतिक्रमण तसेच अतिक्रमण करून त्यामध्ये ठेवण्यात आलेले पोटभाडेकरू याच्या पार्श्वभूमीवर संबंधित सुमारे शंभरच्या वर विविध विक्रेत्यांना प्रत्यक्ष अतिक्रमण स्थळी जाऊन नोटीस बजावून अतिक्रमणे स्वतःहून काढण्याच्या सूचना ग्रामपंचायतीकडून २४ ऑगस्ट रोजी लेखी नोटीसी द्वारे देण्यात आल्या होत्या. मात्र असे असूनही अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे दूर न केल्याने आणि रस्त्यावरील भाजी विक्रेतेही अजूनही रस्त्यालगतच ठाण मांडून बसलेले असल्याने नागोठणे ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण हटाव मोहीम शनिवारी दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी सुरू करण्यात आली.

नागोठणे ग्रामपंचायतीच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेत सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, प्रकाश कांबळे, संतोष नागोठणेकर, भाविका गिजे, ज्योती राऊत, विनिता पाटील तसेच ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, नागोठणे पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी, पत्रकार तसेच काही ग्रामस्थ सहभागी झाले होते.

नागोठण्यातील गजबजलेल्या अशा छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, मच्छी मार्केट, खुमाचा नाका व नुक्कड गल्ली परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेले भाजी विक्रेते, मच्छी विक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले तसेच स्थानिक दुकानदारांनी आपल्या दुकान व गाळ्यासमोर पोटभाडेकरू ठेवून केलेल्या अतिक्रमणामुळे या परिसरात वाहतुकीस अडथळा येऊन वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सार्वजनिक हित लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. अतिक्रमण विरोधी या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे.




