E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़
नागोठण्यातील घराघरात लवकरच शुद्ध पाणी
नागोठणे ग्रामपंचायत मधील बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे ठोस आश्वासन

नवीन अंदाजपत्रकाच्या मंजुरीसह नागोठण्यातील घराघरात लवकरच शुद्ध पाणी पोहोचविणार :
नागोठणे ग्रामपंचायत मधील बैठकीत खासदार सुनील तटकरे यांचे ठोस आश्वासन
खा. सुनील तटकरे यांनी फिल्टर प्लांटची केली प्रत्यक्ष पाहणी : योजनेच्या अद्ययावत पद्धतीच्या दुरुस्तीसाठी ९५ लाखांचा नवीन प्रस्ताव
नागोठणे | महेश पवार
रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असताना एक विशेष बाब म्हणून नागोठणे वासियांसाठी ही शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली होती. नागोठण्याच्या दीर्घकाळ रेंगाळलेल्या व संवेदनशील अशा शुद्ध पाण्याच्या योजनेच्या पूर्णत्वासाठी मी स्वतः फिल्टर प्लांट असलेल्या ठिकाणी अर्धा तास प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या फिल्टर प्लांटच्या अद्ययावत दुरुस्तीसाठी सुमारे ९५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. या रकमेच्या मंजुरीसाठी राज्याच्या पाणीपुरवठा खात्याचे अपर मुख्य सचिव पराग जैन यांच्यासोबत चर्चा करून हा निधी मंजूर करण्यासाठी येत्या मंगळवारी बैठकीची निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळेच नवीन अंदाजपत्रकाच्या मंजुरीसह नागोठण्यातील घराघरात लवकरच शुद्ध पाणी पोहोचविणार असल्याचे ठोस आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजने संदर्भात नागोठणे ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी (दि.३) दुपारी झालेल्या बैठकीत दिले. त्यामुळे नागोठणेकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला शुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता नक्कीच मार्गी लागेल असा ठाम विश्वास चातक पक्ष प्रमाणे शुद्ध पाण्याची वाट पाहत असलेल्या नागोठणेकर नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

यावेळी खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन, भाई टके, रजिप सदस्य सुमित काते, रोहा पं. स. सदस्या समृद्धी कोळी, नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच विलास चौलकर, राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, ग्रामपंचायत सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , महसूल विभाग, वीज वितरण कंपनी, महापारेशन, एमआयडीसीचे अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीत काही गोष्टींकडे लक्ष वेधले. यामध्ये जुन्या फिल्टर प्लांटची सर्व दुरुस्ती एमआयडीसीने येत्या चार-पाच दिवसात करून देण्याचे असून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ते मान्य केले. ढोबळ अंदाजपत्रकानुसार रुपये ९५ लाख रुपयांच्या नवीन मंजूर रकमेतून बंद फिल्टर प्लांटची अद्ययावत पद्धतीची दुरुस्ती, नवीन जलवाहिनीसह गरज लागेल त्या ठिकाणी जलवाहिनीचे काम करणे, फिल्टर प्लांटकडे जाणाऱ्या रस्त्याचे वरील स्ट्रीट लाईट तातडीने दुरुस्ती करून आज संध्याकाळी लाईट सुरू केल्याचा निरोप मला पाठवा असेही खासदार तटकरे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना ठणकावले.

जलजीवन योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात गावे, वाडी – वस्त्यांवर ९५ टक्के घरांतून पाणी पोहोचले असल्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने दिसत असली तरी खासदारांच्या बैठकीत रायगड जिल्ह्याचा आढावा सादर करताना यावर आक्षेप घेतल्याची माहिती यावेळी खासदार तटकरे यांनी दिली तसेच, ज्या ठिकाणी ठेकेदाराकडून चुकीचे काम झाले असेल अथवा गुणवत्ता पूर्ण काम झाले नसेल तर अशा ठेकेदाराची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचा निर्णय आहे केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या लोकसभा मतदारसंघात ज्या ठेकेदाराने एकट्याने १५–१५ कामे घेतली आहेत मात्र योजना पूर्ण केलेल्या नाहीत अशा ठेकेदारांचीही मी माहिती घेणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टर प्लांटच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून, आवश्यक ती उपाययोजना फिल्टर प्लांटमध्ये करून नवीन मंजुरीसह या योजनेतील पाणी घरोघरी जाईल या अपेक्षेन मी आज हा दौरा केला असून योजनेच्या मंजुरीनंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल. नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेतील कामाच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनात बैठकांचा फार्स मी कधीच केला नाही. अनेक सरकारी योजना कार्यान्वित करण्यासाठी सरकारमधील एक माध्यम म्हणून अधिकाऱ्यांशी सांगड घालण्यासाठी या बैठका केवळ पाठपुराव्यासाठी घेतल्या आहेत. त्यामुळे नागोठणे शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारा अतिरिक्त निधी सरकारकडून शंभर टक्के मंजूर करून आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील. तसेच ही योजना पूर्ण झाल्यानंतर पुढील पंचवीस वर्षे त्यावर पैसे मिळणार नाहीत त्यामुळे ठेकेदारानेही काम करताना गुणवत्ता राखली पाहिजे असेही यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी योजनेच्या संबंधित ठेकेदाराला बजावले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते किशोरभाई जैन यांनी खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे पादचरी उड्डाणपुलासाठी मंजूर केलेला शंभर कोटी रुपयांच्या निधीबद्दल आभार व्यक्त केले. त्याचबरोबर अंबा नदीतील गाळ काढणे, नागोठणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, आदितीताई तटकरे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असताना सदस्य म्हणून मी नागोठणे तालुका निर्मितीचा एकमुखी ठराव मंजूर करून घेतला होता, त्यामुळे राज्य सरकारच्या धोरणानुसार नवीन तालुका निर्मितीच्या वेळी नागोठण्याला प्राधान्य देणे याबाबतीत किशोरभाई जैन यांनी खासदार सुनील तटकरे यांना निवेदन सादर करून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.




