E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातआंदोलनकायदा व सुव्यवस्थाटॉप न्यूज़महाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़
तीन दिवसानंतर पूर्ववत
वीज वितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांच्या संतापात वाढ

पाटणसई गावातील वीज पुरवठा तीन दिवसानंतर पूर्ववत
वीज वितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांच्या संतापात वाढ
वायफाय इंटरनेट केबलच्या कामाचा फटका : वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास
नागोठणे | महेश पवार
नागोठणे शहर व परिसरात वीजपुरवठा सुरळीत राहण्याच्या बाबतीत सुधारणा होण्याऐवजी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणातच दिवसेंदिवस वाढ होत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात वीज वितरण कंपनीच्या नागोठणे कार्यालयाला पूर्णत: अपयश आलेले दिसत आहे. असे असतानाच नागोठण्याजवळील पाटणसई गावातील रविवारी खंडित झालेला वीज पुरवठा तीन दिवसानंतर मंगळवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सुरळीत झाला. त्यामुळे तेथील नागरिक सुखावले असले तरी वीज वितरणचे अभिनंदन करण्याची इच्छाच त्यांच्याकडे उरलेली नाही. विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या नागोठणे विभागातील जनतेच्या संतापात मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच वायफाय इंटरनेट केबलच्या कामाचा फटका बसून नागरिकांना नाक त्रास सहन करावा लागत आहे.

या संदर्भात वाकण व पाटणसई ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार वाकण नाका या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गलगत भूमिगत विजेची केबल रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत सुरू असलेल्या वायफाय इंटरनेट केबल च्या कामात तोडण्यात आली. यामुळे नागोठणे शहर व आजूबाजूच्या परिसरातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला. तसा अधिकृत मेसेजही नागोठणे वीज वितरण च्या कर्मचाऱ्यांकडून वीज वितरणच्या व्हाट्सऍप ग्रुपवर तसेच नागोठण्यातील इतर व्हाट्सऍप ग्रुप वर रविवारी दुपारी पावणेदोन वाजण्यांच्या सुमारास पाठवण्यात आला होता. मात्र ही विद्युत केबल कशामुळे तुटली हे वीज वितरण कडून स्पष्ट करण्यात आले नव्हते. मात्र वाकण नाका व पाटणसई गावातील ग्रामस्थांनी ही केबल वायफाय इंटरनेटच्या केबल टाकण्यासाठी करण्यात येणाऱ्या खोदकामामुळेच तोडण्यात आल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून विजेची केबल पूर्ववत जोडण्यात आल्यानंतर नागोठणे शहर व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.

मात्र त्यानंतर थोड्याच वेळात पाटणसई गावातील वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचे ऑइल लिकेज होऊन तेथे स्पार्किंग होऊन हा ट्रान्सफॉर्मर रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ना दुरुस्त झाला. त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी इतर सिंगल फेज वाहिनी द्वारे पाटणसई गावाला वीज पुरवठा केला मात्र हा वीज पुरवठा अर्ध्या तासाच्या वर टिकू शकला नाही. त्यानंतर सोमवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी पाटणसई गावासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर संध्याकाळी बसविण्यात आला. मात्र हा ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर १५ ते २० मिनिटातच नादुरुस्त झाला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण होऊन त्यांनी मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना वाकण नाक्यावर बोलवून त्यांना घेराव घालून याप्रकरणी जाब विचारला.

अनधिकृतपणे सुरू असलेल्या वायफाय इंटरनेट केबलच्या कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यांच्यावर अजून पर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही ? असा जाबही यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी उपस्थित महावितरणचे नागोठणे कार्यालयातील सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग व कर्मचाऱ्यांनी आधी पाटणसई गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम आम्ही करतो त्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका घेतली. त्यानंतर मंगळवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नव्याने आणलेला दुसरा ट्रान्सफॉर्मर बसून पाटणसई गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. असे असले तरी पाटणसई गावातील नागरिकांना मात्र तीन दिवस अंधारात राहावे लागले.

पाटणसई गावातील नागरिकांच्या विद्युत उपकरणांचे प्रचंड नुकसान :–
पाटणसई ग्रामस्थांकडून उपलब्ध माहितीनुसार पाटणसई ग्रामपंचायतची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीतील महामार्ग लगत वायफाय इंटरनेट केबलच्या कामात वाकण नाक्यावर तोडण्यात आलेली विजेची केबल, त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात सिंगल फेज वरून पाटणसई गावाला केलेला वीज पुरवठा, दोन वेळा बदलण्यात आलेले विद्युत ट्रान्सफॉर्मर यामुळे अनेक वेळा विद्युत पुरवठा ये –जा करीत विजेचा दाब कमी जास्त झाल्याने पाटणसई गावातील अनेक नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रिज व इतर विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याचे व त्यांना आर्थिक फटका बसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या नुकसानीची भरपाई वायफाय इंटरनेट केबलच्या ठेकेदाराकडून आम्हाला तातडीने मिळावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराही स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे




