E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
रिलायन्सने प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे काम पूर्ववत सुरू करावे : खा. सुनील तटकरे
रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना

रिलायन्सने प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे काम पूर्ववत सुरू करावे : खा. सुनील तटकरे
रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुचना
सुप्रीम पेट्रोकेमनेही प्रियदर्शनी संस्थेला काम देण्याची मागणी
नागोठणे | महेश पवार
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन युनिट मधील पक्क्या मालाची वाहतूक करण्याचे अधिकृत ठेकेदार असलेल्या नागोठण्यातील प्रियदर्शनी चालक-मालक – वाहक – सहकारी वाहतूक संस्थेच्या कामात रिलायन्स कंपनीने अचानक २० टक्के कपात केली आहे. त्यामुळे आमच्या संस्थेच्या सभासदांवर उपासमारीची वेळ आली असून रिलायन्स कंपनीने पूर्वी प्रमाणेच आमच्या संस्थेला ६० टक्के मालवाहतूक करण्याचे काम द्यावे यासाठी प्रियदर्शनी चालक-मालक सहकारी वाहतूक संस्थेच्या पदाधिकारी व सल्लागार मंडळाने लोकनेते, खासदार सुनील तटकरे यांची शुक्रवारी (दि.२४) सकाळी भेट घेतली. यावेळी लोकनेते, खासदार सुनील तटकरे यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे युनिटचे अध्यक्ष शशांक गोयल यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कडक शब्दात सूचना करतानाच प्रियदर्शनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर लवकरात लवकर चर्चा करून संस्थेला पूर्वीप्रमाणेच काम मिळवून देण्यास सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रियदर्शनी चालक-मालक वाहतूक सहकारी संस्थेच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

लोकनेते, खासदार सुनील तटकरे यांची प्रियदर्शनी चालक-मालक – वाहक सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व सल्लागार मंडळाकडून सुतारवाडी येथील “गीताबाग” मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात भेट घेण्यात आली. त्यावेळी प्रियदर्शनी संस्थेचे संस्थापक मारुती देवरे, सल्लागार भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, लियाकतशेठ कडवेकर, अध्यक्ष शैलेश रावकर, माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक बाळासाहेब टके, सिराजभाई पानसरे, सचिव शकील शेख, सभासद जितेंद्र जाधव, रमेश बोरगी आदींसह अन्य सभासद यावेळी उपस्थित होते.

नागोठण्यातील प्रियदर्शनी चालक-मालक–वाहक सहकारी वाहतूक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकनेते, खासदार सुनील तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नागोठणे परिसरातील स्थानिक मालक, चालक व वाहक असलेली ही वाहतूक संस्था गेली २९–३० वर्षे नागोठण्यातील रिलायन्स कंपनी येथून मालवाहतुकीचे व्यवसाय करीत आहे. आम्ही रिलायन्स कंपनीचे मुख्य वाहतूकदार आहोत व आम्ही पूर्णतः रिलायन्स कंपनीवर अवलंबून आहोत आणि आम्हाला सुरुवातीपासूनच कंपनीतील एकूण माल वाहतुकीच्या ६० टक्के काम मिळत होते. परंतु मागील दोन वर्षापासून आमचे भिवंडी व पुणे येथील स्थानिक काम २० टक्के कमी केले आहे. यामुळे आमच्या प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे चालक व मालक यांना पुरेसे काम मिळत नाही. भविष्यात असेच चालू राहिले तर संस्थेच्या सभासदांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. सदर संस्थेत नागोठणे पंचक्रोशी मधील चालक व मालक आहेत. सदर कामाबाबत नागोठण्यातील रिलायन्स कंपनी व त्यांच्या घनसोली येथील कार्यालयात संबंधित अधिकारी मनोज नायर यांची समक्ष भेट घेऊन तसेच ई-मेल द्वारे संपर्क केलेला आहे व त्यांना याची कल्पना दिलेली आहे. परंतु त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असे आमचे मत आहे. तरी आपणाकडून कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांना बोलवून संस्थेस सहकार्य करून आम्हाला योग्य तो न्याय मिळून द्यावा अशी विनंतीही प्रियदर्शनी संस्थेच्या पदाधिकारी व सल्लागार मंडळाकडून खासदार सुनील तटकरे यांना करण्यात आली आहे.

याचबरोबर नागोठण्याजवळील आमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेम कंपनीतील माल वाहतुकीचे काही प्रमाणात काम स्थानिक सहकारी वाहतूक संस्था असलेल्या आमच्या प्रियदर्शनी वाहतूक संस्थेला मिळावे अशी शिफारसही प्रियदर्शनी वाहतूक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकनेते खासदार सुनील तटकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्यानुसार खासदार सुनील तटकरे यांनी सुप्रीम पेट्रोकेम कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आनंद वागळे यांच्याशी तत्काळ भ्रमणध्वनीवर चर्चा करून संस्थेला सहकार्य करण्यासंदर्भात त्यांना तशा सूचना केल्या आहेत.




