E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़वाहतूक
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सण साजरे करा
नशा मुक्ती कार्यक्रमात गुटखा, चरस, गांजा विक्रीवर राहणार करडी नजर

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सण साजरे करा : सपोनि रवींद्र पारखे
नशा मुक्ती अभियानामुळे गुटखा, चरस, गांजा विक्रीवर राहणार करडी नजर
नागोठणे | महेश पवार
आगामी काळात ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव आदी सण नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे शहरासह इतर सर्व गावांत साजरे केले जाणार आहेत. मी या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून नागोठणे शहर हे शांतताप्रिय असल्याचे आणि हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यापुढेही सर्वांनी आपापले सण कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सण साजरे करावेत असे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रवींद्र पारखे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. त्याचबरोबर नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत सर्वत्र नशामुक्ती अभियान कार्यक्रम राबविण्यात येत असल्याने गुटखा, चरस, गांजा विक्री करणारे कुणी आढळून आल्यास त्वरित आम्हाला कळवा, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही रवींद्र पारखे यांनी यावेळी स्पष्ट केले.

नागोठणे पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२२) सायंकाळी संपन्न झालेल्या शांतता समितीच्या या बैठकीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर,
काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशपाक पानसरे,
भाजप रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर,
सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष अकबरशेठ पठाण, काजीम पानसरे, शिवसेना कार्यकर्ते बाळू रटाटे, असगर सय्यद, महिला दक्षता समितीच्या सुजाता जवके, माजी सरपंच निलोफर पानसरे, नंदा गायकवाड, राजेश्री टके, पोलीस शिपाई स्वप्निल भालेराव, यांच्यासह शांतता व मोहल्ला समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते.

नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करताना नदी ठिकाणी लहान मुले, वयस्कर व्यक्ती, महीला यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याबाबत सूचना द्याव्यात, ईद-ए-मिलादचा उत्सव सामाजिक सलोखा, बंधुभाव व शांततेचा संदेश देत साजरा करावा, जन्माष्टमी साजरा करताना दहीहंडी पथक यांना इजा होणार नाही याकरिता मॅट चा वापर करावा तसेच लहान मुलांकरिता सुरक्षिततेचे साधने वापरावे, सण साजरे करण्यासाठी आवश्यक परवानगी आपले सरकार मार्फत ऑनलाईन घ्याव्यात, मिरवणूक काढण्यापूर्वी आवश्यक त्या परवानगी घेण्यात याव्यात. व परवानगीतील अटी/शर्तींचे काटेकोर पालन करावे. मिरवणुकीदरम्यान ध्वनीक्षेपकाचा आवाज व वापर शासनाच्या नियमांनुसार करावा, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील अशा घोषणा, गाणी, पोस्टर्स किंवा कृती करू नयेत, सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ किंवा फोटो प्रसारित करू नयेत व असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, मिरवणुकीमध्ये सहभागी युवकांनी शिस्त व संयम राखावा तसेच दुचाकी/चारचाकी वाहनांद्वारे धोकादायक प्रकार करू नयेत, मिरवणुकीच्या मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये, इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील असे कृत्य करू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात कळविणे अशा विविध सूचना या बैठकी देण्यात आल्या.

याशिवाय नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोर ठेवलेले पोटभाडेकरू, रस्त्याच्या दुतर्फा बसणारे भाजी विक्रेते, रस्त्याला खेटून लावलेल्या हातगाड्या व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, शहरात बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक दहीहंडी ठिकाणी व इतर सणांच्या दिवसात एसटी स्थानक परिसरात पोलिसांची नेमणूक करणे, अशा प्रकारच्या अनेक महत्त्वपूर्ण सूचना या बैठकीत उपस्थित नागरिकांनी केल्या.




