E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातआंदोलनकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
महामार्गाच्या साईड पट्टीचे नुकसान
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका

ऑप्टिकल फायबर केबलच्या कामात मुंबई गोवा महामार्गाच्या साईड पट्टीचे नुकसान
महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका
कल्याण टोल प्लाझाची तक्रार : केबलचे काम करणाऱ्या एजन्सीवर कारवाईची मागणी
नागोठणे | महेश पवार
भारतमाला परियोजना अंतर्गत ईपीसी (EPC) मोडवर महाराष्ट्र राज्यातील किमी ४२.३०० (कासू) ते किमी ८४.६०० (इंदापूर) दरम्यानच्या एनएच – ६६ (NH – 66) (जुना एनएच – १७) च्या पनवेल – इंदापूर जोडणीच्या चार पदरीकरणाचे उर्वरित काम मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग येथे केंद्र असलेल्या कल्याण टोल प्लाझाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुरळीत करण्यासाठी कल्याण टोल प्लाझा कंपनीकडून सर्वत्र शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. असे असतानाच ऑप्टिकल फायबर केबलच्या कामात मुंबई गोवा महामार्गाच्या साईड पट्टीचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे ओएफसी (OFC) केबल कंपन्यांद्वारे एनएचएआय (NHAI) च्या मालमत्तेचे नुकसान केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कल्याण टोल प्लाझा कडून तक्रारी अर्जाद्वारे नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

यासंदर्भात कल्याण टोल प्लाझा कडून अधिकृतपणे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, ऑप्टिकल फायबर केबल (OFC) टाकणाऱ्या एजन्सींनी म्हणजेच रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि., मे. पी टू पी नेटवर्क प्रा. लि., मे. दिनेश इंजिनिअरिंग लि., आणि मे. लाईटस्टॉर्म टेलिकॉम कनेक्टिव्हिटी प्रा. लि. या ठेकेदार कंपन्यांनी राष्ट्रीय महामार्ग-६६ (NH-66) च्या पनवेल-इंदापूर विभागावरील प्रकल्प महामार्गाच्या दोन्ही बाजूंना उत्खननाचे (खोदकामाचे) काम केले आहे.

नागोठणे पोलीस ठाण्याला दिलेल्या तक्रारी अर्जानुसार महामार्गाच्या नुकसानी बाबत हे प्रकरण यापूर्वीही नागोठणे पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारी अर्जाद्वारे पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र त्यावेळी नागोठणे पोलीस ठाण्यातून काय कारवाई करण्यात आली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळेच केबल टाकणाऱ्या एजन्सींची हिंमत वाढून ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याच्या कामादरम्यान, संबंधित एजन्सींनी महामार्गाच्या साईड पट्टीचे नुकसान केले आहे आणि मेटल बीम क्रॅश बॅरियर्स (MBCB) व ट्रॅफिक सायनेजेस (वाहतूक चिन्हे) यांसह बसवलेल्या रस्ता सुरक्षा साहित्याला हानी पोहोचवली आहे. कॅरेजवेच्या (मुख्य रस्त्याच्या) शेजारी केलेल्या उत्खननामुळे क्रॅश बॅरियर्स आणि चिन्हांचे पाया सैल झाले आहेत, विस्थापित झाले आहेत आणि त्यांचा समतोल बिघडला आहे. ज्यामुळे महामार्ग पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेवर आणि उपयुक्ततेवर विपरीत परिणाम झाला आहे. याशिवाय ऑप्टिकल फायबर केबलचे काम करणाऱ्या एजन्सींद्वारे केल्या जाणाऱ्या अनियंत्रित उत्खनन उपक्रमांमुळे या प्रकल्प महामार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

अशाप्रकारे खराब झालेल्या रस्ता सुरक्षा यंत्रणांमुळे किंवा असुरक्षित उत्खनन पद्धतींमुळे कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित घटना घडल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ संबंधित ऑप्टिकल फायबर केबल टाकणाऱ्या एजन्सीची असेल असेही या तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही ऑप्टिकल फायबर केबल टाकणारे एजन्सीकडून दिवसाढवळ्या, बिनदिक्कपणे महामार्ग लगत खोदकाम करून केबल टाकण्याचे काम नक्की कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न वाहनचालक व स्थानिक नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर शासकीय यंत्रणेचे डोळे उघडणार का असाही सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. नागोठणे पोलीस ठाण्यात केलेल्या या तक्रारी अर्जामुळे ऑप्टिकल फायबर केबल टाकणाऱ्या या एजन्सींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे हे काम नागोठणे विभागातील कोणत्याही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची परवानगी न घेता अनाधिकृतपणे सुरू असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे या संदर्भात ही केबल टाकण्याचे काम करणाऱ्या एका एजन्सीशी संबंधित आनंद यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.





