E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़वाहतूक
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
विनवली फाटा ते कोरखंडे फाटा रस्त्याची दयनीय अवस्था

रस्त्यासाठी महागाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
विनवली फाटा ते कोरखंडे फाटा रस्त्याची दयनीय अवस्था
नागोठणे | महेश पवार
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून तळा तालुक्यातील डोंगराळ भागात जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता बांधकाम खात्याकडून चार दिवसात दुरुस्त करण्यात आला नाही तर महागाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावातील नागरिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील असा इशारा महागाव हद्दीतील नागरिकांनी दिला आहे. यासंबंधीच्या एकमुखी ठराव महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला.
तळा तालुक्यात समाविष्ट असणाऱ्या डोंगराळ भागातील या मार्गावर विनवली, महागाव, बहुलेवाडी, महागाव आदिवासी वाडी, बारपे, महुरे, कोरखंडे, म्हसाडी, करिवने आदी अनेक गावे आहेत. या गावांकडे येण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरून सुरू होणाऱ्या रस्त्यानेच यावे लागते. याच रस्त्याची खड्ड्यांमुळे अत्यंत दुर्दशा झाली आहे.

ग्रुप ग्रामपंचायत, महागाव येथे दिनांक २४ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात आली. ही ग्रामसभा ग्रामपंचायतच्या प्रशासक सौ. नेरकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ग्रामसभेत आयत्या वेळीच्या विषयावर चर्चा करताना विनवली फाटा ते कोरखंडे फाटा या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याची बाब ग्रामस्थांनी ग्रामसभेत निदर्शनास आणून दिली. तळा तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या या रस्त्यावरूनच इंदापूर ते कोरखंडे एस. टी. गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रस्त्यावरील खड्ड्यांचे कारण देत ही एसटी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अनेक वेळा बंद करण्यात येते. तसेच रस्ता खराब असल्यामुळे या भागात येण्यासाठी टेम्पो किंवा इतर गाडी भाडे दुप्पट करण्यात आले आहे. एखादी गर्भवती महिलेचे बाळंतपण या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दवाखान्यात पोहोचण्यापूर्वी रस्त्यातच होईल की, काय अशी ही भीतीही निर्माण झाली आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर सतत अपघात होत असून अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच आगामी गणेशोत्सव सण यामुळे या ग्रामसभेत उपस्थित असलेले सर्व पक्षीय पुढारी व महागाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ यांनी बांधकाम खात्याच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा हा एकमुखी ठराव मंजूर केला आहे. तसेच या रस्त्यावरील खड्डे चांगल्या पद्धतीने जोपर्यंत भरण्यात येत नाही तोपर्यंत ग्रामस्थांचे हे आंदोलन सुरूच राहील असा स्पष्ट इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.




