Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआंदोलनआरोग्यमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़

खासदार सुनील तटकरेंना साकडे

नागोठणे विभाग राष्ट्रवादीकडून निवेदन सादर

नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटर होण्यासाठी खासदार सुनील तटकरेंना साकडे

नागोठणे विभाग राष्ट्रवादीकडून निवेदन सादर
नागोठणे महेश पवार
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठण्यातील मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ट्रॉमा सेंटरमध्ये रूपांतर करण्यात यावे या मागणीचे व रोहा पंचायत समितीच्या सदस्या समृद्धी कोळी यांचे निवेदन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी आणि नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुतारवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या “गीताबाग” मधील  कार्यालयात सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर, राजू शिंदे, रोशन पारंगे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांची संख्या, नागोठणे परिसरातील औद्योगिक वसाहती आणि नागरिकांची आरोग्य सेवेची गरज लक्षात घेता नागोठणे येथे अत्याधुनिक ट्रॉमा केअर  सेंटर उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की,  मुंबई गोवा महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून अपघातांच्या घटना वारंवार घडत असतात.  दुर्दैवाने नागोठणे परिसरात पुढील सुमारे ४० ते ६० किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही सुसज्जन आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही.  तसेच नागोठणे व परिसरातील सुमारे १०० ते १२५ गावे व वाड्यांमधील नागरिक नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रावरच अवलंबून आहेत.  अपघात किंवा इतर अपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळण्यास विलंब होत असल्यामुळे अनेकदा रुग्णांचे प्राण धोक्यात येतात.  ही परिस्थिती लक्षात घेता नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अत्याधुनिक सुविधा असलेले ट्रॉमा केअर सेंटर उभारणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळून त्यांचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होईल.  तसेच संपूर्ण परिसरातील आरोग्य सेवेत लक्षणीय सुधारणा होईल.  त्यामुळे या विषयाकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊन नागोठणे येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणीही खासदार सुनील तटकरे यांच्याकडे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
“नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटर ची गरज …. खासदार सुनील तटकरे ठरणार आशेचा किरण…”  असे वृत्त बुलंद रायगड न्यूज पोर्टलने सर्वप्रथम २५ मे, २०२६ रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. तदनंतर नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याबाबतीत गांभीर्याने विचार करून रायगडचे कार्यसम्राट खासदार,  लोकनेते सुनील तटकरे यांना निवेदन दिले आहे. याप्रकरणी नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पाठपुरावा करतील आणि खासदार सुनील तटकरे यांच्याकडून नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करून आणतीलच अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!