
प्रा. डाॅ. श्रीकृष्ण तुपारे यांचा ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार ने गौरव
नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यांतर्गत ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी कोकण एज्युकेशन सोसायटी आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, नागोठणे येथील प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे यांची निवड करून त्यांचा नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ त्यांच्या संशोधन आणि समाजकार्यात उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा गौरव केला होता.
डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी एम. एस्सी. एम. एड्. एम. फील पी. एच. डी. या उच्च पदव्यांसह CSIR-NET आणि SET या राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ६० हून अधिक संशोधन लेख आणि पुस्तके प्रकाशित झाले असून, ते पी. एच. डी. या डॉक्टरेट पदवीचे मार्गदर्शक म्हणून ते संशोधकांची नवी पिढी घडवित आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
केवळ वर्गापुरते मर्यादित न राहता त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून एच. आय. व्ही. एड्स जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, मतदार जनजागृती, वृक्षारोपण, शोषखड्डे, आणि पर्यावरण संरक्षणाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवले आहे. या कार्यासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाचे ‘सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ आणि ‘सर्वोत्कृष्ट विभागीय समन्वयक’ हे पुरस्कारही मिळाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैतिक मूल्ये रुजवून त्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. श्रीकृष्ण तुपारे सातत्याने कार्यरत आहेत. या त्यांच्या याशाबद्दल कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ पाटील, कार्यवाह ऍड. पल्लवी पाटील, वरीष्ठ संचालक संजयभाई पाटील, मुख् कार्यकारी अधिकारी सौ. अनिता पाटील, प्राचार्य डॉ. दिनेश भगत सह आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह त्यांच्या शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.




