दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे द्यावे
नागोठण्यातील उड्डाणपुलाचे डोहाळे जेवण महिलांच्या उपस्थितीत उत्साहात

नितीन गडकरी व शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे द्यावे : रवींद्र चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सरकारवर बोचरी टीका
नागोठण्यातील उड्डाणपुलाचे डोहाळे जेवण महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मिरानगर, नागोठणे येथील उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुलाला तडे गेल्याच्या तसेच पुलाचे ‘पोट फुगल्याच्या’ पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने शुक्रवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता अनोख्या पद्धतीने ‘पुलाचे डोहाळे जेवण’ आंदोलन करण्यात आले. डोहाळे जेवण आंदोलनासाठी सजवून आणलेला पाळणा व राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डोहाळे जेवणाच्या साहित्याने पोट फुगलेल्या पुलाची भरलेली ओटी यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने नागोठणे परिसराचे लक्ष वेधून घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सज्जादभाई डावरे, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष संताजी पवार, जिल्हा सरचिटणीस श्रीहर्ष कांबळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष समाधान म्हात्रे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष सदानंद येळवे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अजयशेठ महाडिक, अलिबाग विधानसभा अध्यक्ष सचिन पाटील, विधानसभा सरचिटणीस साईनाथ म्हात्रे, माणगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर, जिल्हा महिला संघटक रिया रेडेकर, अनिता पवार व त्यांच्या महिला सहकारी, सुधागड तालुका अध्यक्ष दिनेश काटकर, गोरेगाव शहर अध्यक्ष अस्लम भऊर, पोलादपूर विभागीय अध्यक्ष भावेश सलागरे, दहिवली विभाग अध्यक्ष सलाउद्दीन सणगे, रोहा तालुका युवक अध्यक्ष मुजाहिद मुजावर, गुड्डू पानसरे, राहील कडवेकर, मिर्जा कुटकी, आलम खान, असिफ शेख, वसीम कडवेकर, शबाब पेणकर, मुशीद कुरेशी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते व महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

या आंदोलनाच्या माध्यमातून मिरानगर नागोठणे उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा, बांधकामातील कथित त्रुटी तसेच जनतेच्या पैशाचा झालेला कथित अपव्यय याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘कुणीतरी येणार गं, येणार गं… कोकणातील हायवे कधी होणार गं, कधी होणार गं…’ हे उपरोधिक गाणे गात सरकारवर टीका केली. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार जिंदाबाद’, ‘भारत माते की जय’, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो, ‘तानाशाही नही चलेगी, नही चलेगी’, भ्रष्टाचार नही चलेगा, नही चलेगा अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले होते. नागोठणेतील हा उड्डाणपूल पूर्णता रद्द करून त्या जागी फ्लायओव्हर पूल उभारण्याची मागणी यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सरकारकडे केली.
नागोठणे उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाला अभियंता आणि ठेकेदारांसोबतच संबंधित मंत्री, खासदार व आमदारही जबाबदार असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. लोकशाहीमध्ये सरकारची कथित तानाशाही चालू देणार नसल्याचे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उड्डाणपुलाच्या भिंतींना काचेच्या पट्ट्या व एमसील लावण्याचे काम सुरू असल्याचा उल्लेख करत “हे काम करण्यामागे ठेकेदाराचा नेमका उद्देश काय?” असा सवालही रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केला.




