नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
तब्बल ८४ तासांनी पालखी मंदिरात परतली

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
तब्बल ८४ तासांनी पालखी मंदिरात परतली
पालखीला एवढा वेळ ही मातेचीच इच्छा असल्याची भावना
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ महाराजांचा शुक्रवारी (दि.३)सकाळी साडेनऊ वाजता मोठ्या उत्साहात सुरु झालेला चैत्र पालखी सोहळा चौथ्या दिवशी सोमवारी (दि. ६) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर तब्बल ८४ तासांनंतर निर्विघ्नपणे पूर्ण झाला. एप्रिल, २०२२ च्या पालखी सोहळ्याला ७५ तास लागल्यानंतर मागील दोन – तीन वर्षे पालखी सोहळ्याची वेळ ४८ ते ५५ तास अशी कमी करण्यात उत्सव समितीला यश आले होते. गेल्या वर्षी ६४ तासांत पालखी मंदिरात परतली होती. मात्र त्यानंतर यावर्षी पालखी सोहळ्याची आतापर्यंतची सर्वात जास्त अशी ८४ तासांची वेळ नोंदली गेली आहे. पालखीला एवढा वेळ लागणे ही मातेचीच इच्छा असावी अशी भावनाही काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान ग्रामदेवतेच्या पालखी सोहळ्याच्या चार दिवसांदरम्यान कुठेही वादग्रस्त घटना व अनुचित प्रकार न घडल्याने मिळालेल्या सहकार्याबद्दल उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर यांनी उत्सव समितीच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.


फोटो : कुंभार आळी ग्रामस्थ मंडळाचा सत्कार करतांना देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव भाई टके सोबत उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर व ग्रामस्थ
माहेरवाशिणींचा व परगावावरून आलेल्या नागोठणेकरांचा हिरमोडश्री जोगेश्वरी मातेच्या पालखी सोहळ्यानिमित्त माहेरवाशिणी माहेरच्या घरी येत असतात. मात्र पालखी सोहळ्यात डिजे वाजविण्यावर बंदी असतानाही यावर्षी काही ठिकाणी नाचण्यासाठी खूप वेळ डीजे वाजविला गेला. पालखीच्या दोन्ही बाजूने दर्शन घेण्याच्या सूचना असतांनाही दोन्ही बाजूने दर्शनास निरुत्साह व महिलांची एकच बाजूला दर्शनासाठी इच्छा, फोटो काढण्यासाठी आणि नाचण्यासाठी पालखी खूप वेळ थांबविली गेली अशा या अनेक कारणांनी पालखी सर्वच ठिकाणी उशिराने पोचली. त्यामुळे आपल्या माहेरच्या घरासमोर पालखीचे दर्शन घेण्यासाठी एक दिवसासाठी आलेल्या माहेरवाशिणींना आणि नोकरी–व्यवसायानिमित्त परगावी राहणाऱ्या आणि एक दिवसाची सुट्टी काढून आलेल्या नागोठणेकरांना दुसऱ्या आळीत किंवा इतर ठिकाणी जाऊन पालखीचे दर्शन घ्यावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान रोहा सारख्या मोठ्या शहरात श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा कमीत कमी वेळेत पूर्ण होत असतानाही नागोठण्यात पालखी सोहळा पूर्ण होण्यास चार दिवस व ८४ तास लागत असतील तर भविष्यात यावर सर्व ग्रामस्थांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत गावातील काही जाणकार व वरिष्ठ मंडळीकडून व्यक्त करण्यात येत आहे.




