E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
नागोठणे ते चोळे विभागासाठी अनंत युवा प्रतिष्ठान कडून दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण
अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स कडून अनेक समाज उपयोगी कामांचा धुमधडाका !

नागोठणे ते चोळे विभागासाठी अनंत युवा प्रतिष्ठान कडून दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण
अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स कडून अनेक समाज उपयोगी कामांचा धुमधडाका !
नागोठणे | महेश पवार
देशातील नावाजलेल्या रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक अनंत अंबानी यांचा वाढदिवस संपूर्ण देशामध्ये धुमधडाक्यात साजरा केला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजचे ते एक यशस्वी उद्योजक तर ते आहेतच पण त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये त्यांचे नाव समाजकार्यामध्ये अग्रेसर आहे. यावर्षी देखील त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथे आठवडाभर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले. या सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून अनंत युवा प्रतिष्ठानकडून नागोठणे ते चोळे विभागासाठी दोन रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि.१२) सायंकाळी नागोठण्यात उत्साह संपन्न झाला. त्याचबरोबर विभागातील गरीब व गरजू अपंग लोकांसाठी व्हील चेअर, वॉकर व स्टिक यांचे वाटपही यावेळी करण्यात आले.

नागोठण्यातील या कार्यक्रमाला अनंत युवा प्रतिष्ठानचे सचिव धीरज घुले पाटील, युवा सामाजिक कार्यकर्ते सद्दाम दफेदार, मनसे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, शिवसेना विभाग प्रमुख प्रविण ताडकर, प्रियदर्शनी वाहतूक संस्थेचे संचालक सिराजभाई पानसरे, विठोबाशेठ दंत, कामगार नेते संजय काकडे, अशोक भोय, नागोठणे माजी सरपंच रियाजशेठ अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जहूरुद्दीन सय्यद, शब्बीरशेठ पानसरे, सुभाष पाटील, इम्रान पानसरे, सगिर अधिकारी, प्रकाश मोरे, आसिफ मुल्ला, जोहेब कुरेशी, यशवंत कुथे, भास्कर म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता कुथे, रंजना माळी आदी मान्यवरांसह नागोठणे व चोळे परिसरातील ग्रामस्थ तसेच अनंत युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमांची सुरुवात आसपासच्या कंपनी लगतच्या सर्व ग्रामस्थांसाठी व कॉन्ट्रॅक्ट लेबर यांच्यासाठी तसेच कंपनी मधील कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाने झाली आहे. सर्व उपस्थितांसाठी नागोठणे येथील पेट्रोकेमिकल टाऊनशिप मधील फुटबॉल ग्राउंडवर जवळपास ३१ हजार लोकांसाठी हे स्नेहभोजन आयोजित केले गेले. बेणसे, झोतिरपाडा, कुहीरे, कडसुरे वणी वरवठणे, पिगोंडे, शिहू, मुंढाणी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थ या आनंद सोहळ्यास हजर होते. त्याचप्रमाणे कंपनी लगतच्या कुहीरे, कडसुरे, शिहू, वणी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांसाठी मोफत धान्य वाटपालाही सुरुवात झाली आहे. गंगावणे, चाफेवाडी, बंगालवाडी, धनगरवाडी, कागदावाडी, किल्लावाडी, गोएंडा वाडी, कुहिरे कातकरवाडी, खोपटी, चिकली, ऐनावाडी, बोरावाडी, ढेपेवाडी, काळकाई, चेराठी, वरणावाडी, सडावाडी, डोहाचीवाडी, पायरावाडी, नाईकवाडी, गायनावाडी आदी २० आदिवासीवाड्यांना या धान्य वाटपाचा फायदा होणार आहे. १५०० धान्य वाटप किट व १५०० वॉटर पुरिफायर यांचेही वाटप होणार आहे. अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअर, वॉकर, काठी इत्यादी वस्तूंचेही वितरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे गोदानाचे महत्त्व ओळखून कंपनी लगतच्या गोरक्षकांना काही ठराविक गोदानही केले जाणार आहे.

तसेच कंपनी लगतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप, शालेय बॅगांचे वाटप, क्लोरोवॅट बाटल्यांचे वाटप, चॉकलेट वाटप सुरू झालेले आहे. कंपनी लगतच्या शाळांना साधारणपणे ३ हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यांना वनतारा मूवी दाखवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक जीवनात स्वच्छता राखली पाहिजे या हेतूने याविषयी प्रात्यक्षिके व स्वच्छतेविषयी माहिती करून देण्यात येत आहे.
अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त लवकरच रुद्राभिषेक घालण्यात येणार आहे. तसेच परिसरात ३१०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात अनेक समाज उपयोगी कामांचा धुमधडाका सुरू झाला असून आसपासच्या सर्व गावातील सर्व समाजात याविषयी आनंद व्यक्त केला जात आहे.




