E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
नागोठण्यात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसर झाला भागवेमय

नागोठण्यात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न
श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसर झाला भागवेमय
पारंपरिक वेशभूषा व पारंपरिक वाद्यांनी आणली रंगत
नागोठणे | महेश पवार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असतांनाच नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरासमोरील प्रांगणात रविवार दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी आयोजित केलेले विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न झाले. नागोठणे शहर व आजुबाजूच्या परिसरातील गावांमधील हिंदू बांधवांनी, महिलांनी व मुलांनी केलेली पारंपरिक, ऐतिहासिक वेशभूषा साकारून सादर केलेले कार्यक्रम व पारंपरिक वाद्यांनी या हिंदू संमेलनात रंगत आणली. कार्यक्रमस्थळी लावलेल्या भगव्या झेंड्यांमुळे श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसर भगवेमय झाला होता.

या हिंदू संमेलनात विभागातील गावागावातून, वाड्यांमधून पारंपारिक वेशभूषा व पारंपारिक वाद्यांसह आलेल्या अबाल – वृद्धांनी शोभायात्रा काढत श्री जोगेश्वरी मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या प्रांगणात असलेल्या कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम सादर करण्यात आले. नागोठण्यातील सुप्रसिद्ध बाल बासरी वादक कु. मेघ पोटे याच्या सुरेल वादनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रफुल नागोठणेकर, रोह्याचे श्री दामले सर तसेच कौस्तुभ दिवेकर यांचे शिष्य यांनी विविध गीते सादर केली. कु अनुष्का भोय हिने कथ्थक नृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले रायगड विभाग संघचालक आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागोठण्यातील आंगर आळी येथील शिवस्मारकाचे दर्शन घेतले. यावेळी आंगर आळी ग्रामस्थांनी रघुजीराजे आंग्रे यांचे उस्फुर्त स्वागत केले.
तद्नंतर रघुजीराजे यांनी नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरात जाऊन मातेचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव भाई टके त्यांच्या समवेत होते. त्यानंतर रघुजीराजे यांनी कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या हिंदू बांधवांना संबोधित केले. नंतर रोहा येथील प्रसिद्ध लेखक आणि गडकोटांचे अभ्यासक सुखद राणे यांनी रायगड जिल्ह्यातील शिवकथा आणि शिवरायांचे व्यापक हिंदुत्व या विषयावर उद्बोधन केले आणि ऐतिहासिक नागोठणे शहर परिसरात असलेल्या गडकिल्ल्यांची उपयुक्त अशी माहिती दिली. तसेच हे गडकिल्ले पाहण्याविषयी आवाहन केले.

दरम्यान या विशाल हिंदू संमेलनाच्या निमीत्ताने श्री जोगेश्वरी माता मंदिरालगत असलेल्या कै. तात्यासाहेब टके सभागृहात यावेळी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्र तसेच शिल्प प्रदर्शन तसेच पुस्तक विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर रात्री महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने विविध संप्रदाय जाती, वाड्या, वस्त्या, गावे यांच्या संस्कृती, परंपरा आणि एकतेचा महासंगम या संमेलनातून अनुभवायला मिळाला. पंचक्रोशीतील सर्व हिंदू समाजाने या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन संमेलन समितीचे अध्यक्ष चेतन कामथे व आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले होते.




