मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज
खासदार सुनील तटकरे याप्रकरणी ठरणार आशेचा किरण

मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज
खासदार सुनील तटकरे याप्रकरणी ठरणार आशेचा किरण
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागी ट्रॉमा केअर सेंटरचा प्रस्ताव सादर करावा
नागोठणे | महेश पवार
नागरिक आणि उद्योगांसाठी दळणवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्यामध्ये महामार्ग उभारणीची कामे सर्वत्र वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग असलेल्या आणि सुमारे १७ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही काही अपवाद वगळता अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र असे असले तरी, महामार्गांवरील अपघातासारखी दुर्घटना घडल्यास जखमींचा जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणीच महामार्गावर कुठेही झालेली नसल्याचे वास्तव आहे. माणगाव येथे मंजूर झालेले ट्रॉमा केअरही अद्याप कागदावरच आहे. त्यामुळेच मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटरची नितांत गरज आहे. सद्य स्थितीत नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतराचे वारे वाहत असतांनाच या इमारतीच्या नवीन बांधकामाची मंजुरी घेताना या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागी ट्रॉमा केअर सेंटरचा प्रस्ताव सादर करावा अशी मागणी आता जोर धरत आहे.
रस्त्यांवरील गंभीर अपघात, मोटार वाहनांची टक्कर, गंभीर किंवा प्राणघातक दुखापत झालेल्या प्रवाशांच्या उपचारांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज, तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी, अतिदक्षता विभाग (आय. सी . यु.) आणि त्वरीत शस्त्रक्रियेची सोय, सुसज्ज रुग्णवाहिका असलेले रुग्णालय म्हणजे ट्रॉमा केअर सेंटर. तसेच आपत्कालीन स्थितीत तातडीने सर्च वैद्यकीय उपचार देणारी ही विशेष सुविधा असते. अपघातात मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी जखमींना तातडीने उपचाराची गरज असते. अपघात झाल्यापासून ६० मिनिटांचा काळ हा जीव वाचविण्याच्या दृष्टीने ‘गोल्डन अवर’ मानला जातो. यासाठी ट्रॉमा केअर सेंटर महत्वाची भूमिका बजावताना दिसून येते.

मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे हद्दीत अनेक धोकादायक अपघात स्थळे आहेत. अपघातांचा हॉट स्पॉट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या या ठिकाणांवर अनेकांचे बळी गेले आहेत. यातील बहुतांश मृत्यू हे वेळीच उपचार न मिळाल्याने झाले आहेत. नागोठण्याहून पनवेलला सुसज्ज हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ लागतो. यामुळे जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर होते. त्यामुळे नागोठण्याला ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झाल्यास माणगाव, कोलाडपासून ते वडखळ पर्यंतच्या अपघातग्रस्त रुग्णांना त्याचा जीव वाचविण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.
राज्यातील अनेक द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर आहेत. पनवेल-पणजी महामार्गावर महाडमध्ये ट्रॉमा केअर सेंटर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर तातडीने उभारण्याची गरज असतांनाच शासनकर्ते मात्र टोल नाके सुरू करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळेच तर माणगाव येथील मंजूर झालेल्या ट्रॉमा केअर सेंटरला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मात्र असे असले तरी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा नव्याने होणाऱ्या बांधकामाच्या मंजुरीचा आराखडा तयार करतांना तो ट्रॉमा केअर सेंटर म्हणूनच मंजूर करण्याची नितांत गरज आता निर्माण झाली आहे. तशी मागणीही आता जोर धरत आहे.
खासदार सुनील तटकरे ठरणार आशेचा किरण
मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे हद्दीत असलेल्या अनेक अपघात प्रवण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांत घडलेल्या लहान मोठ्या अपघातातून शेकडो निष्पाप नागरिकांचा, महिलांचा, बालकांचा बळी जाऊन अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. या अपघातग्रस्तांना केवळ योग्य वेळी आवश्यक ते उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. ट्रॉमा केअर सेंटरमुळे हे निष्पाप जीव वाचू शकले असते. त्यामुळे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागोठण्यात ट्रॉमा केअर सेंटर होण्यासाठी जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे हेच हे काम करू शकतात याची सर्वांना खात्री असल्याने खासदार तटकरे यांच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.
ट्रॉमा केअर सेंटरची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सुविधा
तात्काळ मूल्यांकन :रुग्णालयात पोहोचताच दुखापतीचे गांभीर्य ओळखून त्वरित उपचार सुरू केले जातात.
जीव वाचवणारे उपचार : गंभीर रक्तस्त्राव थांबवणे, फ्रॅक्चरवर उपचार करणे आणि व्हेंटिलेटरसारख्या सुविधा पुरवल्या जातात.
अपघात प्रवण क्षेत्रे : महामार्गांवर किंवा अपघातप्रवण भागात गंभीर रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ही सेंटर्स अत्यंत महत्त्वाची असतात.




