E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़

एमबीबीएस डॉक्टरविना नागोठणे प्रा. आ. केंद्र वाऱ्यावर 

प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणाही कुचकामी

नागोठण्यात मृतदेह शवविच्छेदनासाठी होतेय एमबीबीएस डॉक्टरचे दर्शन 

एमबीबीएस डॉक्टरविना नागोठणे प्रा. आ. केंद्र वाऱ्यावर 
प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणाही कुचकामी
कर्मचाऱ्यांची इतरही अनेक पदे रिक्त : सुरक्षेच्या कारणास्तव महिला डॉक्टरने सोडली नोकरी 

नागोठणे  | महेश पवार

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या व रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती व अतिमहत्वाच्या नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही महिन्यांपासून एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे काही बाबतीत रूग्णांचे हाल होत आहेत. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ मृतदेह शवविच्छेदनासाठी आल्यास येथे अतिरिक्त कार्यभार असलेल्या खवली (ता. सुधागड) प्रा. आ. केंद्रातील एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दर्शन होत आहे. त्यामुळे एमबीबीएस डॉक्टरविना नागोठणे प्रा. आ. केंद्र वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच अनेक रिक्त पदांसह रात्रपाळीत अत्यावश्यक असलेले पुरुष शिपाई पदही भरले जात नसल्याने महिला कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणाही कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तरी राजिपची प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा सुधारेल ही माफक अपेक्षा येथील जनतेने बाळगली होती पण ती फोल ठरली असून जनतेचा पूर्णता अपेक्षाभंग झाल्याचे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिस्थितीवरून  दिसून येत आहे. त्यामुळे मध्यवर्ती नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत गेंड्याची कातडी पांघरलेल्या शासकीय यंत्रणेने आपल्यात सुधारणा करून नागोठण्यात तातडीने एमबीबीएस वैद्यकीय अधिका-याची नियुक्ती करावी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदेही तातडीने भरावीत अशी जोरदार मागणी रूग्ण व नागरिकांतुन होत आहे.

नागोठणे विभागात ५६ गावे व ६५ आदिवासी वाड्यांचा समावेश असल्यामुळे मोठ्या संख्येतील गरीब, गरजू सर्वसामान्य जनता व आदिवासी बांधव यांना काही आजार झाला तर ते सरकारी दवाखान्यात धाव घेत असतात. त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य  केंद्रात रुग्णांची नेहमीच गर्द्दी असते. असे असतानाही राजिपची आरोग्य यंत्रणा उदासीन आहे. नवीन एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी भरण्यासंदर्भात समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात येणार असून लवकरच नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला त्या दर्जाचा वैद्यकीय अधिकारी मिळेल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी एप्रिल महिन्यात सांगितले होते.  मात्र येथील डॉ. आदित्य शिरसाट व डॉक्टर नितीन टकले हे दोघेही एम.बी.बी. एस. वैद्यकीय अधिकारी गेल्यापासून गेले दोन–तीन महिने हे पद रिक्त आहे. पद भरण्यासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतलेली आजपर्यंत दिसून आलेली नाही. एकीकडे गडब सारख्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन तर सुधागड तालुक्यातील खवली या ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात एक एम. बी. बी. एस. वैद्यकीय अधिकारी कार्यरत असताना मध्यवर्ती नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाबतीत शासकीय यंत्रणा उदासीन का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

सध्या नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन बी. ए.एम.एस. महिला डॉक्टर कार्यरत असल्या तरी त्यांची नियुक्ती तीन – तीन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने झाली आहे. तर आरोग्य केंद्रातील निवासस्थानी राहणाऱ्या यातील एक महिला डॉक्टर रात्रपाळीत आरोग्य केंद्रात पुरुष शिपाई नसल्याने सुरक्षेच्या व भीतीपोटी कारणास्तव आपण आज शुक्रवारी (दि.१९) राजीनामा देत असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र खरोखर वाऱ्यावर असल्याचे वारंवार दिसून येत असून या आरोग्य केंद्राला कुणी वाली आहे का ? असा संतप्त सवाल येथे येणारे रुग्ण उपस्थित करीत आहेत.

आरोग्य भवन मध्ये प्रक्रिया सुरू : डॉ. प्राची नेहुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी 
एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीसाठी मंत्रालयातील आरोग्य भवन येथे प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी नियुक्ती शासन स्तरावरून करण्यात येईल.  तर शिपाई व इतर पदांची भरती ही प्रशासकीय स्तरावरून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
तुम्ही सुचवा, आम्ही भरती करतो : श्रीमती नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप 
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एम बी बी एस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागेसंदर्भात रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्याशी संपर्क साधला असता नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विषयात तेच तेच किती वेळा बोलायचे. तुम्ही डॉक्टर सुचवा आम्ही भरती करू अशाप्रकारे बेजबाबदारपणाचे व वेळकाढूपणाचे वक्तव्य राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी केले. 

दरम्यान आता नागोठणे व परिसरातील जनतेने,  जनतेसाठी एम. बी. बी. एस. डॉक्टर शोधून त्यांना भरती करण्यासाठी जिल्हा परिषदेत न्यायचे का ? मग शासनाचे प्रतिनिधी व लोकसेवक म्हणून एका वरिष्ठ पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांचे काम काय ? असे संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केले जात आहेत. 

Related Articles

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!