E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
मोबाईल ॲप वरून होणार खताचे बुकींग
शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे रोहा कृषी विभागाचे आवाहन

“फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ” प्रणालीद्वारे मोबाईल ॲप वरून होणार खताचे बुकींग
शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे रोहा कृषी विभागाचे आवाहन
नागोठणे | महेश पवार
केंद्र शासनाच्या कृषि विभागाकडून रायगड जिल्हयामध्ये खत खरेदी व विक्री साठी “फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ” ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. जिल्हयातील शेतक-यांना खताचा साठा उपलब्ध आहे की, नाही याची खातरजमा करण्यासाठी कृषी केंद्रावर फे-या माराव्या लागत होत्या. त्यामुळे शेतक-यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जायचे. आता शेतक-यांना आपल्या मोबाइल ॲपच्या माध्यमातून घरी बसून स्वतः च्या आवश्यकतेप्रमाणे व हव्या त्या खत विक्रेत्याकडून युरिया, सुफला, डीएपी व इतर अनुदानित खताची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे रोहा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य शासनाच्या रोहा तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतक-यांना खताची उपलब्धता ऑनलाईन बुकींग व वितरण प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक आणि शेतकरी हिताची करण्यासाठी हे अॅप्लीकेशन विकसित केले आहे. शेतक-यांनी आपल्या मोबाईलवरून ” फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल “अॅप्लीकेशन डाऊनलोड करावे. स्मार्ट फोन नसल्यास जवळच्या सीएससी सेंटर, PACS, रासायनिक खत विक्रेता, FPO यांच्याकडून बुकींग करता येते. त्यासाठी आपला फार्मर आयडी, आधार कार्ड, जमीन/पिकाची माहिती आवश्यक असते. फार्मर आयडी नसल्यास आधार क्रमांकाद्वारे बुकिंग करता येते.
मोबाईल अॅपद्वारे तुमचा फार्मर आयडी किंवा आधारकार्ड लॉगिन करून आपणास शिफारशी प्रमाणे आवश्यक ते खत निवड करावी. व खत उपलब्ध असणा-या जवळच्या कृषी केंद्राची निवड करून बुकींग केल्यानंतर QR कोड किंवा टोकन नंबर मिळेल. तो QR कोड किंवा टोकन नंबर जतन करून कृषि केंद्राकडे जावून खत खरेदी करता येते.
हा QR कोड किंवा टोकन नंबर दोन दिवस वैध राहील. वेळेत खत घेवू शकला नाही तर हा QR कोड किंवा टोकन नंबर रद्द करून पुन्हा बुकींग करता येते. तसेच बुकींग नंतर तुम्ही स्वतः खत खरेदी साठी जावू शकत नसल्यास तुमच्या वतीने दुसरी व्यक्ती (प्रतिनिधी) खत आणू शकते. आपली सर्व माहिती सुरक्षित राहते. जिल्हयात सध्या पुरेसे खत उपलब्ध असून खताची कुठलीही कमतरता भासणार नाही. याबाबत कृषी विभागाने पूर्ण नियोजन केले आहे.
तरी शेतक-यांनी आपल्या फार्मर आयडी व आधार क्रमांकाच्या आधारे मोबाईल वरून खताची
बुकींग करून QR कोड किंवा टोकन नंबर द्वारे खते खरेदी करावे. यासाठी रायगड जिल्हयात ” फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ” प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी कृषी विभागामार्फत आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे. जिल्हास्तरावरील / तालुका क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी तसेच कृषि निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज, खताची उपलब्धता तपासणी, बुकींग अथवा खत वितरणासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास तालुका कृषी अधिकारी गुणनियंत्रण निरीक्षक यांच्याशी संपर्क साधता येईल.




