E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यकायदा व सुव्यवस्थामहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़वाहतूक
विकास कामांना सर्वतोपरी सहकार्य
अतिक्रमण, मच्छी विक्रेते, पाणीपट्टी, अनधिकृत गाळे आदी विविध मुद्द्यांवरून गाजली ग्रामसभा

नागोठण्यातील विकास कामांना सर्वतोपरी सहकार्य राहील :
नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक यांचे ग्रामसभेत आश्वासन
अतिक्रमण, मच्छी विक्रेते, पाणीपट्टी, अनधिकृत गाळे आदी विविध मुद्द्यांवरून गाजली ग्रामसभा
नागोठणे | महेश पवार
निधी अभावी नागोठण्यातील विकास कामांना अडथळा येत आहे असे वक्तव्य नागोठणे ग्रामपंचायत सरपंच सुप्रियाताई महाडिक यांनी १५ ऑगस्ट, २०२६ रोजी संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या मनोगतात केले होते. मात्र त्याचवेळी विकास कामांसाठी निधी मंजूर करून आणल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीची एनओसी दिली जात नाही अशी तक्रार काही ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. मात्र त्याचवेळी ग्रामसभेच्या अध्यक्ष असलेल्या सरपंच सुप्रियाताई महाडिक यांनी आमचा विकास कामांना कोणताही विरोध नसून, गावासाठी विकास कामे मंजूर करून आणल्यास त्या विकास कामांना सर्वतोपरी सहकार्य राहील असे ठोस आश्वासन नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक यांनी ग्रामसभेत दिले. तत्पूर्वी सभेच्या सुरुवातीलाच मागील ग्रामसभेचे इतिवृत्त, मंजूर घरकुलांची यादी, ग्रामसभेत आलेले अर्ज यांचे वाचन करण्यात आले.

नागोठणे ग्रामपंचायतीची कोरम अभावी २० ऑगस्ट रोजी तहकूब झालेली यावर्षीची तिसरी ग्रामसभा सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयाच्या सभागृहात घेण्यात आली. नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या ग्रामसभेला उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, प्रकाश कांबळे, संतोष नागोठणेकर, अकलाख पानसरे, पूनम काळे, भाविका गिजे, अमृता महाडिक, विनिता पाटील, सुप्रिया काकडे, शबाना मुल्ला, सुलताना लंबाते, ज्योती राऊत, बाळासाहेब टके, सिराज पानसरे, जोहेब कुरेशी आदींसह ग्रामस्थ या ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसभेच्या सुरुवातीलाच राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव शिवसेना विभागीय संघटक दिनेश घाग यांनी मांडला त्यास प्रकाश मोरे यांनी अनुमोदन दिले. तसेच रायगड जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांनी सुमारे सव्वा कोटी रुपये निधीची विकास कामे नागोठण्यासाठी मंजूर करून आणली असल्याने ही कामे करण्यासाठी आवश्यक ते कागदोपत्री सहकार्य ग्रामपंचायतीने करावे अशी मागणी दिनेश घाग यांनी केली. तर आझाद मोहल्ला येथील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये बेकायदेशीरपणे दुकान गाळ्यांचे बांधकाम झाल्याचे ग्रामस्थ अशफाक सुमरा यांनी निदर्शनास आणून देत संबंधित बांधकाम व्यवसायिक ग्रामपंचायतीला जुमानत नसल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

रमाई नगर येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीचे नुकसान झाल्यानंतर त्याचा निधी ग्रामपंचायतकडे वर्ग होऊनही गेल्या बारा वर्षात या कमानीचे काम पूर्ण न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीकडून सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले. मात्र असे असतानाच काही मोठ्या अतिक्रमणधारकांना सूट दिल्याचे निदर्शनास आणून, अतिक्रमणावर कारवाई करताना कोणताही भेदभाव करू नये तसेच गावातील विविध भागात, मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या सर्वच अतिक्रमणांवर ग्रामपंचायतीने कारवाई करावी अशीही ग्रामस्थ विहान हेंडे यांनी केली. तसेच रमाई नगर मध्ये पंधरा टक्के व इतर अनुदानातून १३ लाख रुपये नक्की कुठे खर्च करण्यात आले असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करीत असताना काही अतिक्रमणधारक दादागिरीची भाषा वापरत उपसरपंच व सदस्यांना जुमानत नसल्याचे व उद्धटपणाची भाषा वापरल्याचे दिसून आले. त्यामुळे केवळ गोरगरीब व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणावरच कारवाई न करता अशा बड्या व मुजोर अतिक्रमणधारकांवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ विनोद अंबाडे यांनी केली. नागोठण्यातील शुद्ध पाणीपुरवठाच्या योजना पूर्णत्वास न आल्याने गावातील नागरिकांना आजही अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी करतानाच अशुद्ध पाण्यासाठी आम्ही पाणीपट्टीचे पैसे का भरावे असा संतप्त सवालही काही ग्रामस्थांनी उपस्थित केला. याच ग्रामसभेत बिअर शॉपीचा परवान्यासाठी ग्रामपंचायतची एनओसी मिळण्यासाठी अनेक अर्ज आल्याने ग्रामसभेत एकच हशा पिकला.
नागोठणे कोळीवाड्यातील रस्त्यालगत बसून मच्छी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्याने, आधी बाहेरून मच्छी विक्री करण्यासाठी येणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना कुठेही बसून देऊ नका, मच्छी मार्केटची डागडुजी करा अशी मागणी कोळीवाड्यातील महिला व पुरुष मच्छी विक्रेत्यांनी ग्रामसभेत केली. त्याचवेळी काही ग्रामस्थांनी बाहेरील मच्छी विक्रेते स्वस्त दराने मच्छी विक्री करीत असल्याचे सांगून, स्थानिक मच्छी विक्रेते जास्त भावाने मच्छी विक्री करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आधी स्थानिक मच्छी विक्रेत्यांनी माफक दरात मच्छी विक्री सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराज व्यक्त करत ग्रामसभेला वीज वितरणचा एकही कर्मचारी उपस्थित न राहिल्याबद्दल वीजवितरणचा निषेध असा ठराव मांडला. तसेच वीज वितरणच्या येथील सहायक अभियंत्याच बदली करण्यासाठी ठरावही करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अशाप्रकारे इतरही अनेक, विविध प्रश्नांवर नागोठण्याची ग्रामसभा गाजली. या ग्रामसभेत उपस्थित करण्यात आलेल्या काही प्रश्नांना सरपंच, उपसरपंच यांनी उत्तरे दिली. तर काही प्रश्नांना उत्तरे देण्यास असमर्थता जाणविल्याचे निदर्शनास आले.




