Uncategorized

पिगोंडे ग्रामपंचायती मधील आंबेघर ग्रामस्थांचा पाण्यासाठी हंडा मोर्चाचा इशारा

ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याची केली होती तयारी

पिगोंडे ग्रामपंचायती मधील आंबेघर ग्रामस्थांचा पाण्यासाठी हंडा मोर्चाचा इशारा

ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याची केली होती तयारी 

नागोठणे | महेश पवार 
उष्णतेचा दाह अधिकाधिक तीव्र होत असतानाच नागोठण्याजवळील पिगोंडे ग्रामपंचायतीमधील आंबेघर येथील महिला व ग्रामस्थ गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आंबेघर ग्रामस्थांनी ११ मार्च रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे पिगोंडे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिला आहे. 
नागोठण्याजवळील पिगोंडे ग्रामपंचायती मधील सरपंच व सदस्यांची मुदत पूर्ण झाल्याने ग्रामपंचायतीत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. या ग्रामपंचायतीचा कारभार सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. त्यामुळे आंबेघर ग्रामस्थ व महिलांकडून पिगोंडे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंबेघर गावातील ग्रामस्थांना गेल्या एक महिन्यापासून पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. पिगोंडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजय अहिरे यांना वारंवार फोन करूनही ते याबाबतीत चालढकलपणा करीत आहेत.  त्यामुळे आंबेघर गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची त्वरित व्यवस्था करावी अन्यथा पिगोंडे ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही या लेखी निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.
बुधवार दिनांक ११ मार्च रोजी हे निवेदन देण्यात आले असूनही ग्रामपंचायत अधिकारी विजय अहिरे यांनी कोणतीही हालचाल न केल्याने ग्रामस्थांनी गुरुवार दिनांक १२ मार्च रोजी सकाळी पिगोंडे ग्रामपंचायतीचे कार्यालय गाठले. यावेळी आंबेघर मधील गंगाराम मिणमिणे, बळीराम बडे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या. मात्र ग्रामपंचायत अधिकारी विजय अहिरे आजारी असल्याने कार्यालयात आलेले नव्हते.  नंतर पिगोंडे ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावण्याची तयारी आंबेघर ग्रामस्थांकडून सुरू असतानाच रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्याजवळ ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यावेळी आपण लवकरच यावर उपाययोजना करू असे आश्वासन शुभदा पाटील यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावण्याचा आपल्या भूमिकेस तात्पुरती स्थगिती दिली.
दरम्यान यासंदर्भात पिगोंडे ग्रामपंचायतचे अधिकारी विजय अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या संख्येने झालेली भाडेकरूंची वाढ यामुळे पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात ग्रामस्थांच्या सहकार्याने यावर कशाप्रकारे तोडगा करण्यात येईल याविषयी चर्चा करून उपाययोजना करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!