जे एस डब्ल्यू कंपनीच्या स्लॅग वेस्टमुळे शेतीसोबत तळ्यांतील मासेमारीही धोक्यात !
जे एस डब्ल्यू कंपनीच्या मनमानी कारभारविरोधात पेण तहसीलदारांकडे तक्रार

जे एस डब्ल्यू कंपनीच्या स्लॅग वेस्टमुळे शेतीसोबत तळ्यांतील मासेमारीही धोक्यात !
जे एस डब्ल्यू कंपनीच्या मनमानी कारभारविरोधात पेण तहसीलदारांकडे तक्रार
शेतकऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली : शेतकऱ्यांचा आक्रमक इशारा
नागोठणे | महेश पवार
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ परिसरातील कोलेटी ते तळेखार गावांच्या हद्दीत जे एस डब्ल्यू कंपनीकडून कंपनीतील स्लॅग वेस्टचा वापर करून सुरू असलेल्या रस्ते बांधकामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या टाकाऊ स्लॅग मुळे भातशेती आणि शेत तळ्यातील मासेमारी धोक्यात आली आहे. त्यामुळे सतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पेण तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पेण तहसीलदारांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जे एस डब्ल्यू कंपनीकडून “स्लॅग वेस्ट मटेरियल” वापरून रस्ते तयार केले जात असून, हा प्रकार अधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. २७ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत अशा मटेरियलचा वापर करू नये, असे निर्देश देण्यात आले होते. तरीही कंपनीने मनमानी सुरूच ठेवल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.
दरम्यान, या परिसरात रस्त्यालगत अनेक शेत तळी (तळे) असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. रसायन युक्त स्लॅग वेस्ट आगामी काळात येणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत तळ्यांमध्ये मिसळल्यास मासेमारीवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे उदरनिर्वाह धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमचे पोट शेती आणि मासेमारी या दोन्हीवर चालते. जर तळ्यांमधील पाणी दूषित झाले, तर दोन्ही व्यवसाय संकटात येतील.” त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित काम थांबवावे व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश :-
“वेस्ट मटेरियल हे कोणत्याही प्रकारे जमिनीशी व नैसर्गिक पाण्याची संबंध येणार नाही असे साठविले पाहिजे. या मटेरियल द्वारे कच्चा रस्ता देखील बनविता येणार नाही. पक्का रस्ता बनविताना देखील त्यामध्ये कोणत्या मटेरियल चे प्रमाण किती असावे ते नमूद केले आहे. त्याचप्रमाणे काँक्रीट मध्ये मिक्स करूनच ते रस्त्याकरिता वापरावे असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हे वेस्ट मटेरियल साठवले अथवा भराव म्हणून टाकले तरी आपली व आपल्या आजूबाजूच्या जमिनी कायमस्वरूपी नापीक होऊ शकतात त्याचप्रमाणे भूजल म्हणजे जमिनीत असणारे पाणी हे देखील मनुष्य वापरास घातक होऊ शकते असेही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (दि.२०) पेण तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांनी तक्रार सादर केली. याबाबतीत प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान यासंदर्भात जे एस डब्ल्यू कंपनीचे जनसंपर्क अधिकारी बळवंत जोग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्या कंपनीचे स्लॅग वेस्ट हे प्रदूषणमुक्त आहे. त्याचा वापर अनेक ठिकाणी करण्यात आला असून अद्याप स्लॅग संदर्भात कुणाचीही तक्रार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




